नाशिकमध्ये रिक्षातून लिफ्ट दिली अन् निर्जनस्थळी नेऊन प्रवाशाला लुटले
पंचवटी : प्रतिनिधी
रिक्षातून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत लुटणार्या टोळीचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हा घडल्याच्या अवघ्या 24 तासांच्या आत गुन्हे शोध पथकाने तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून रिक्षा, मोबाइल आणि चाकू असा एकूण 1.20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप थोडाई कुमार (32, रा. निलगिरी बाग) हे पीओपी कामगार 4 मार्च रोजी दुपारी नांदूर नाका रिक्षा स्टँडवर थांबले होते. यावेळी पांढर्या हूडच्या रिक्षातील चालकाने त्यांना निलगिरी बागेत सोडतो, असे सांगून रिक्षात बसवले. मात्र, रिक्षा निलगिरी बागेकडे न नेता रुद्र फार्मसमोरील निर्जनस्थळी नेली. तिथे आरोपींनी फिर्यादीला मारहाण करत चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील मोबाइल व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी पथक रवाना केले. पीएसआय विकास पंचमुख यांच्या पथकाने परिसरातील तब्बल 23 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित रिक्षाचा शोध सुरू असतानाच, पोलीस अंमलदार मनोज मोरे व शक्ती पेंढारकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित रिक्षा नांदूर गावाजवळील स्मशानभूमीजवळ उभी आहे. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून प्रशांत अशोक भारसाखळे, निवृत्ती उर्फ सोनू राजू जाधव आणि विजय भगवान मोरे (सर्व रा. नांदूर नाका) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रिक्षा (एमएच 15 एके 5631), विवो कंपनीचा मोबाइल, रोख रक्कम आणि लाकडी मुठीचा चाकू हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक विकास पंचमुख, दादासाहेब वाघ, इमरान शेख, मनोज परदेशी, नीलेश काटकर, शिवाजी आव्हाड, देसाई, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, दीपक भुजबळ, अमित पवार आणि वैशाली बच्छाव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास हवालदार देसाई करीत आहेत.
Three people who robbed passengers arrested within 24 hours