एटीएम दरोड्याप्रकरणी तिघांना 7 वर्षांची सक्तमजुरी

9 लाखांहून अधिक दंड

सिडको : विशेष प्रतिनिधी
आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकून पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या टोळीतील तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने 7 वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 3 लाख 1 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा मिळालेल्या आरोपींची नावे मिलनसिंग रामसिंग भादा (43), गजानन ऊर्फ भोंद्या मोतीराम कोळी (27), किस्मतसिंग रामसिंग भादा (35, तिघे रा. मोहाडी, धुळे) अशी आहेत. याप्रकरणी एकूण 9 लाख 9 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


29 सप्टेंबर 2019 रोजी पहाटे सातपूर परिसरातील खोडे पार्कमधील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर या टोळीने कटावणीच्या सहाय्याने दरोडा टाकला. एटीएमचा कॅशबॉक्स बाहेर काढून बोलेरो गाडीत ठेवण्याच्या प्रयत्नात असताना, फिर्यादी आणि साक्षीदार घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपींनी धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला करत त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि एटीएम मशीन तसंच टाकून ते   पळून गेले.
या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. तत्कालीन सहायक आयुक्त अनिरुद्ध आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ. सुधीर कोतवाल, अ‍ॅड. रेश्मा जाधव आणि अ‍ॅड. शैलेश सोनवणे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार श्यामराव सोनवणे आणि महिला हवालदार राजश्री बोंबले यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *