सटाणा : प्रतिनिधी
शहरातील मालेगाव रस्त्यावर टीव्हीएस शोरूमसमोर तीन मोटारसायकलींचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुण व एक लहान बालक जखमी झाले. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
मालेगाव रस्त्यावर असलेल्या टीव्हीएस शोरूमसमोर शेमळी येथील गौरव अरुण पवार (25) हा तरुण एमएच 41 बीए 4777 या मोटारसायकलवरून सटाण्याकडून शेमळीच्या दिशेने जात होता, तर सटाण्याच्या दिशेने एमएच 41 बीपी 5162 या मोटारसायकलवरून येत असलेले कौतिकपाडे येथील राजेंद्र चंद्रसिंग देवरे (40), राजेंद्र भाऊसिंग जगताप (45) यांच्या व एमएच 41 एजे 9709 या मोटारसायकलवर असलेले मोखभंगी येथील पोपट नाना पवार यांच्या मोटारसायकलला गौरव पवारने समोरून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात मोखभंगी येथील पोपट नाना पवार हे लखमापूर येथून आपल्या सासरवाडीवरून मोखभंगी येथे जात होते. त्यांच्या सोबत पत्नी व दोन लहाने मुले, त्यात एक पाच महिन्यांचे लहान बाळ होते. अपघातानंतर मागे बसलेली महिला उंच उडाली, परंतु तिने आपल्या हातातील पाच महिन्यांचे बाळ तसेच कवटाळून ठेवल्याने त्या बाळाला काही झाले नाही. जखमींवर उपचार सुरू आहेत.