‘समृद्धी’वर थरारक लूट; कारची काच फोडून महिला प्रवाशांना मारहाण

कोनांबे शिवारातील घटना; सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल लंपास

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारात समृद्धी महामार्गावर थांबलेल्या कारची काच फोडून महिला प्रवाशांना मारहाण करीत रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.2) पहाटे घडली. या प्रकारामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर (ठाणे) येथील रहिवासी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी कारने निघाले होते. सोमवारी पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास त्यांची कार सिन्नर तालुक्यातील कोनांबे शिवारातील पोल क्रमांक 580 जवळ थांबली. महामार्गाच्या कडेला वाहन उभे असताना अचानक तीन ते चार अनोळखी इसम तोंडाला रुमाल बांधून हातात बांबू, काठ्या, चाकू व चॉपर घेऊन धावत आले. या इसमांनी कारची काच फोडून गाडीत असलेल्या अंजू सबाग दाणी, दीपा रमेश वाधवा व सिया सबाग दाणी या महिलांसह चालकाला धमकावत मारहाण केली. त्यानंतर महिलांच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी के. के. पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, उपनिरीक्षक दादासाहेब गाढवे, वारुंगसे आदींनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी दीपा रमेश वाधवा (रा. उल्हासनगर, ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाढवे
करीत आहेत.

Thrilling robbery on ‘Samriddhi’; Female passengers beaten up after breaking car window

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *