“वाघ एकला राजा” पोस्टवरून प्रभाग २४ मध्ये खळबळ
माजी नगरसेवक, नागरिक संतप्त; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सिडको : दिलीपराज सोनार
शिवसेनेचे (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांचे पुतणे वेदांत तिदमे यांच्या एका वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “वाघ एकला राजा” या शीर्षकाची पोस्ट विरोधकांचा अवमान करणारी असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे माजी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांचा पुतण्या वेदांत तिदमे यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एका वाघाभोवती कुत्र्यांचा घेराव दाखवण्यात आला असून, त्यावर “वाघ एकला राजा” अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. या चित्रामधून सूचकपणे विरोधकांची कुत्र्यांशी तुलना करण्यात आल्याचा आरोप होत असून, ही पोस्ट राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या प्रभाग क्रमांक 24 मध्ये माजी नगरसेवक राजेंद्र महाले, कल्पना चुंबळे,तसेच ठाकरे गटाच्या दिवंगत कल्पना पांडे ,चंद्रकांत पांडे यांच्यासह अनेकांनी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळातील योगदान नाकारण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत माजी नगरसेवकांनी व्यक्त केले.
“कोण वाघ आणि कोण कुत्रा, हे जनता ठरवेल,” असे म्हणत माजी नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. “आम्ही गप्प बसणार नाही. समाजमाध्यमांचा वापर संवादासाठी व्हावा, अपमानासाठी नव्हे,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
स्थानिक नागरिकांनीही सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “हा प्रभाग कोणाच्या बापाची जागीर नाही,” असे म्हणत एका ज्येष्ठ नागरिकाने युवा नेत्यांच्या उद्दाम वृत्तीवर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, काही सुजाण नागरिकांनी समेटाची भूमिका घेतली असली, तरी सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पोस्ट मागे नेमका काय उद्देश होता राजकीय हल्ला की वैयक्तिक अभिव्यक्ती यावर अजूनही स्पष्टता नाही.या वादामुळे प्रभाग २४ मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.