मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

 

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

शहापूर : साजिद शेख

शहापूर तालुक्यातील अस्नोली येथील विषबाधेने मृत्यू झालेल्या तीन मुलींना जन्मदात्री आईनेच अन्नामध्ये तणनाशक टाकून त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. संध्या भेरे असे महिलेचे नाव असून मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याचा बनाव तिने रचला होता. जन्माला आलेल्या तीनही मुलींना सांभाळण्याचा आलेला कंटाळा, त्यांच्या खर्चाचा असह्य ताण यामुळे संध्या हिने तिघींची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मुलींच्या वडिलांनी घेतलेला संशय खरा ठरला असून मुलींची आई संध्या भेरे हिला किन्हवली पोलिसांनी अटक केली आहे.
शहापुर लगत असलेल्या चेरपोली येथील संदीप भेरे यांची पत्नी संध्या ही तीन मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून शहापूर तालुक्यातील आस्नोली येथे तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी २१ जुलै या दिवशी काव्या (१०), दिव्या (८) व गार्गी (५) या तिघींच्या जेवणात  संध्या हिने तणनाशक रसायन टाकले होते. त्यामुळे तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागला. मुलींच्या आईनेच अस्नोली येथील खासगी डॉक्टर व नंतर शहापुर उपजिल्हारुग्णालयात दाखल केले.
मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबई येथील नायर व घोटी येथील एसएमबीटी या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र मृत्यूशी झुंज सुरू असताना त्या तिघींवर काळाने झडप घातली. उपचारादरम्यान यामधील काव्या व गार्गी यांचा गुरुवारी (२४ जुलै) तर दिव्या हिचा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२५ जुलै) सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. मुलींच्या आईने अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.परंतु या घटनेत फक्त मुलींनाच त्रास झाल्याने मुलींचे वडील संदीप भेरे यांनी मुलींच्या आई संध्या हिच्यावर संशय व्यक्त केला होता. संशयाच्या सुईचा धागा पकडून किन्हवली पोलिसांनी मुलींची आई संध्या हिला चौकशी साठी ताब्यात घेतले होते. यामध्ये जन्माला आलेल्या तीनही मुलीच, त्यांना सांभाळण्याचा कंटाळा व त्यांच्या खर्चाचा असह्य ताण यामुळे जीवन त्रस्त झाल्याने मुलींच्या जेवणात तणनाशक रसायन मिसळून त्यांना खायला घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. संध्या भेरे हिला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिली. याबाबत चा अधिक तपास किन्हवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *