पिंपळगाव बसवंत: वार्ताहर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावी जाण्यास काही अवधी असताना पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर टोल कर्मचार्यांचा हलगर्जीपणा पहायला मिळाला. नाशिकहुन मालेगावच्या दिशेने जाणार्या हायवा ट्रकला अचानक बॅरीकेटस आडवे लावल्याने ट्रक त्यावर धडकला. यामध्ये हायवा ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी मालेगाव येथे जाणार होते. त्यांचा ताफा पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर येण्यास काही अवधी बाकी असतानाच पिंपळगाव टोल कर्मचार्यांचा मुजोरपणा बघायला मिळाला. राख घेऊन जाणारा हायवा ट्रक (क्र. एमएच १५- एचडब्ल्यू ५४९९) टोल नाक्यावर येत असताना समोरील कारने टोल न भरताच धूम ठोकली. त्या कारला अडविण्यासाठी टोल कर्मचार्यांनी बॅरिकेडस लेनवर आडवे लावले. मात्र, कार निघून गेली. तर पाठीमागून येणारा हायवा ट्रक बॅरिकेडस वर जाऊन आदळल्याने मोठे नुकसान झाले आहे.