भाजप, शिवसेना शिंदे गटाला रोखले; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा नाही
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड विभागातील 6 प्रभागांतील 23 जागांपैकी 10 जागांवर उबाठा शिवसेनेने विजय मिळवून भाजप आणि शिवसेनेला धूळ चारली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर भोपळाही फोडता न आल्याने देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्यासाठी हा मोठा मानहानिकारक पराभव मानला गेला आहे. या निवडणुकीतून नाशिकरोड विभागात ‘उबाठा’ हा सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे या दिग्गजांना पराभवाचे धनी व्हावे लागल्याने भाजप आणि शिवसेनेला मतदारांनी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे.
प्रभाग क्रमांक 20 अ – सतीश आनंदराव निकम (भाजप)- 6087, ब – सीमा राजेंद्र ताजने (भाजप)-7130, क -जयश्री अजित गायकवाड (भाजप)-6639 आणि ड- कैलास सुरेश मुदलियार (शिवसेना)-7365 हे उमेदवार विजयी झाले. या प्रभागात तीन जागांवर भाजपने आपली सत्ता कायम राखली असली तरी या प्रभागात भाजपच्या पॅनलचे कॅप्टन संभाजी मोरुस्कर यांना शिवसेनेचे कैलास मुदलियार यांनी धूळ चारल्याने गड आला पण सिंह गेला, अशी गत भाजपची झाली.
शिवसेनेचे कैलास मुदलियार यांच्या वादळात भाजपचे संभाजी मोरुस्कर यांच्या प्रतिष्ठेचा पालापाचोळा झाला.
प्रभाग 22 मध्ये ‘उबाठा’ची राष्ट्रवादीला धोबीपछाड
अ-वैशाली प्रमोद दाणी (उबाठा) 8908, ब- योगेश लक्ष्मण गाडेकर (उबाठा) 12141, क-संजीवनी संजय हांडोरे (उबाठा) 10215 आणि ड- केशव सीताराम पोरजे (उबाठा) 9791 हे उमेदवार विजयी झाले. या प्रभागात पुन्हा एकदा उबाठा शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध करून राष्ट्रवादीला धोबीपछाड दिली. या प्रभागात देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या आश्वासनांना मतदारांनी साफ नाकारल्याचे या निकालातून सिद्ध झाले.
प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपचा झंझावात
प्रभाग क्रमांक 21 अ – कोमल प्रताप मेहरोलिया -(भाजप) 8113, ब – रमेश शंकर धोंगडे (शिवसेना) – 6372, क – श्वेता निर्मल भंडारी (भाजप) – 6618, ड – जयंत अशोक जाचक (भाजप) – 6105 हे उमेदवार विजयी झाले. या प्रभागात भाजपच्या झंझावातात शिवसेना, उबाठा आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली. या प्रभागात भाजपाने शिवसेनेचे सूर्यकांत लवटे आणि ज्योती खोले या दोघा माजी नगरसेवकांना पराभूत केले. अवघ्या 358 मतांनी पराभूत झालेले भाजपचे नितीन खोले यांनी फेरमतमोजणीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिला. या प्रभागाची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएमवरील सीलवरून एका उमेदवाराच्या प्रतिनिधीने सवाल उपस्थित केल्याने वाद होऊन काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया थांबवावी लागली. यावेळी मतमोजणी कार्यालयात मोठा गदारोळ निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप
करावा लागला.
‘Torch’ blazing in 10 out of 23 seats in Nashik Road division