कंटेनरच्या अपघातामुळे वाहतूक तीन तास ठप्प

इगतपुरी : प्रतिनिधी
मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात कंटेनरचा अपघात झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. या अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे येणार्‍या वाहनांची रांगच रांग लागली होती. महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. अपघातस्थळी महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राम व्होंडे व पोलीस पथकाने धाव घेऊन ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि. 26) मुंबईहून नाशिककडे येणारा कंटेनर हा सकाळी कसारा घाटामध्ये आला असता, अचानक बंद पडला. बंद पडून उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून येणारा कंटेनर आदळल्यामुळे कंटेनर रोडवर आडवा झाल्याने संपूर्ण कसारा घाट ठप्प झाला होता. अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे येणारी वाहतूक ही बंद झाली होती. इगतपुरी हायवे प्रायव्हेट लिमिटेड, महामार्ग सुरक्षा पोलीस व इतर प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी जुन्या कसारा घाटातील वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली. यानंतर क्रेनच्या मदतीने आडवा झालेल्या कंटेनरला रस्त्यातून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, या अपघातामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *