ओझर : वार्ताहर
येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ओझर हद्दीत असलेल्या दहावा मैल येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे, या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले असून, त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दहावा मैल येथे सतत होणार्या वाहतूक कोंडीमुळे धुळे, सटाणा, नंदुरबार, चांदवड, पिंपळगावकडे जाणार्या वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. तर धुळे, मालेगाव, सटाणा या ठिकाणाकडून नाशिककडे येणार्या वाहनधारकांनादेखील या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून कुठलीही ठोस उपाययोजना या ठिकाणी केली जात नसल्याने सायंकाळच्या सुमारास रोज या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. परिणामी, तासन्तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे महामार्गावर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.