मनमाड शहरात वाहतूक कोंडी; गाडी बंद, रस्ता बंद

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा!

मनमाड : प्रतिनिधी
दुष्काळी अन् पाणीटंचाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनमाड शहराची येथील इंदूर-पुणे महामार्गावर रोज होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. मुंबई, पुणेसारख्या मेट्रो सिटीत ज्याप्रकारे वाहतूक कोंडी होते, त्याचप्रमाणे सकाळ-सायंकाळ मनमाड शहरातदेखील वाहतूक कोंडी होत आहे.
शहरातून जाणार्‍या इंदूर-पुणे महामार्गावर असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिजमुळे सर्वांत जास्त वाहतूक कोंडी होत असून, या ब्रिजची परिस्थिती अशी आहे, गाडी बंद, रस्ता बंद. या पुलावर एक छोटी जरी गाडी बंद पडली तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. खासदारसाहेब, या वाहतूक कोंडीच्या जाचातून आम्हाला मुक्त करा, अशी आर्त हाक मनमाड शहरातील नागरिकांनी खा. भास्कर भगरे यांच्याकडे केली आहे. असे म्हणतात, प्रत्येक शहराला काहीना काही ऐतिहासिक वारसा असतो. त्या ऐतिहासिक वारशामुळे त्या शहराची ओळख निर्माण होते. मनमाड शहराला आधीच दुष्काळी आणि पाणीटंचाईची झळ असल्याने त्याची देशभरात ओळख आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहराला वाहतूक कोंडीमुळे नवी ओळख निर्माण झाली आहे. शहरातून जाणार्‍या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रोज वाहतूक कोंडी होते. मनमाड शहरातील नागरिक या वाहतूक कोंडीला कंटाळले असून, याआधीदेखील मनमाड शहरातून बायपास व्हावा, यासाठी तत्कालीन आमदार पंकज भुजबळ व तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता.
भूमिअधिग्रहणपर्यंत काम झाले होते. मात्र, घोडे कुठे आडले हे आजपर्यंत समजू शकले नाही. मनमाड शहरातील भोळीभाबडी जनता अजूनही हा बायपास होईल, या आशेवर बसली आहे. मनमाड शहरातून जाणार्‍या इंदूर-पुणे महामार्गावर एक तर बायपास करा किंवा शक्य होत असेल तर उड्डाणपूल करा, अशी मागणी मनमाडकरांतर्फे अनेकदा केली आहे. मनमाड शहरातील नागरिकांनी खा. भगरे यांच्याकडेदेखील अनेकदा मागणी केली आहे. खा. भगरे यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास 500 कोटींपेक्षा जास्त रस्त्यांना मंजुरी मिळवून आणली आहे व त्याचे कामदेखील तत्काळ सुरू झाले आहे. याच धर्तीवर इंदूर-पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिज किंवा बायपास यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मनमाडकरांकडून होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *