नाशिक : वार्ताहर
राज्य पोलीस दलातील शुक्रवारी (दि.९) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर पोलीस दलातील पाच, नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सहा आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीतल्या तीन वरिष्ठ निरीक्षकांची बदली झाली आहे.
राज्यातील २२५ पोलीस निरीक्षकांच्या शुक्रवारी (दि. ९) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी नाशिक मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सुनील रोहलके व विशेष शाखेचे कुमार चौधरी यांची महाराष्ट्र पोलीस अकादमीत बदली करण्यात आली आहे. पोलीस अकादमीतील शाम निकम आणि बापूसाहेब महाजन यांची नाशिक ग्रामीणमध्ये नियुक्त झाले आहेत. या बदल्यांमुळे नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणमध्ये लवकरच नवीन पोलीस निरीक्षक दाखल होणार आहेत. नाशिक आयुक्तालयात नव्याने तीन, पोलीस अकादमीत दोन आणि पाच निरीक्षक रूजू होणार आहेत.
पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, नाशिक गुन्हे-दोनचे आनंदा वाघ आणि एमपीएचे किरण साळवी या तीन अधिकाऱ्यांना सहायक पोलीस आयुक्त पदी बढती मिळाली आहे. त्यांचे महसूल संवर्ग निश्चित झाले असले, तरी पदोन्नतीवरील बदली मात्र ते प्रतिक्षेत आहेत. त्यांची सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणावरुन बदली झाली आहे. सहायक आयुक्त म्हणून लवकरच त्यांच्याही बदलीचे आदेश निर्गमित होणार आहेत.