साधुग्राममधील झाडे वाचवण्यासाठी वृक्षप्रेमी एकवटले

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहरात दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आहे. यासाठी महापालिका कामे करत आहे. तपोवनातील साधुग्राममधील 1,834 झाडे तोडण्याची सूचना आहे. याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. बुधवारी (दि.19) साधुग्राममध्ये चिपको आंदोलन झाले. नागरिक, सामाजिक संघटना आणि वृक्षप्रेमी यात सहभागी झाले. महापालिका प्रशासनाविरोधात त्यांनी हे आंदोलन केले. या झाडांबाबत तीनशेहून अधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत.

झाडे तोडण्यावर नागरिकांचा आक्षेप

याप्रकरणी शुक्रवारी होणारी सुनावणी साधुग्राममध्येच घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. राजेंद्र बागूल, तल्हा शेख, कॉ. राजू देसले, रोहन देशपांडे, संदीप भानोसे आणि जितेंद्र भावे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. “झाडे वाचवा-पर्यावरण वाचवा” अशा घोषणा देण्यात आल्या. पर्यावरणाचे महत्त्व वृक्षप्रेमी नागरिकांनी प्रशासनासमोर मांडले.

झाडांचे महत्त्व काय?

एक हजार 834 झाडे तोडणे हा मोठा निर्णय आहे. याचा थेट परिणाम परिसराच्या तापमानावर होईल. स्वच्छ हवा, पावसाचे प्रमाण आणि जैवविविधता यावर परिणाम होईल. गोदावरी नदीचे आरोग्य झाडांवर अवलंबून आहे. झाडे माती स्थिर ठेवतात. ती प्रदूषण रोखून पाण्याचे चक्र टिकवतात. मागील दहा वर्षांत उगवलेली ही झाडे महत्त्वाची आहेत. ती तोडणे निसर्गासाठी हानिकारक आहे.

दोन तास चालले चिपको आंदोलन

मनपाने झाडांवर पिवळ्या रंगाची फुली मारली आहे. ही झाडे तोडण्यात येतील अशा नोटिसाही प्रसिद्ध केल्या. त्याच ठिकाणी पर्यावरणप्रेमींनी सकाळी 8.30 वाजता आंदोलन सुरू केले. हे आंदोलन 10.30 वाजेपर्यंत, म्हणजे दोन तास चालले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी झाडे वाचविण्याची मागणी केली. झाडे तोडण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी वृक्षप्रेमी करत आहेत.

 

नाशिकची जनता, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटना तपोवन वाचविण्यासाठी एकत्र उभ्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे म्हणजे नाशिकची ओळख संपवण्यासारखे आहे.
– राजेंद्र बागूल, माजी नगरसेवक

वृक्षतोड म्हणजे परंपरा, आस्था आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात घालण्यासारखे आहे. तपोवन हे तप आणि वन या नावाचा अर्थ प्रत्यक्ष सांगणारे नाशिकचे प्राचीन आध्यात्मिक केंद्र आहे. ऋषिमुनींनी साधना केलेल्या या स्थळाला नाशिकच्या सांस्कृतिक वारशात विशेष स्थान आहे. त्यामुळे महापालिकेने वृक्षतोडीचा विषय सोडून द्यावा.

– कॉ. राजू देसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *