वीस जणांविरोधात गुन्हे दाखल
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे दि.२२ ते २८ एप्रिल ‘वसुंधरा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्या नुसार सहाही विभागांतर्गत ‘खिळे मुक्त वृक्ष’ अभियान राबविण्यात आले आहे. सुमारे दहा हजार पेक्षाही अधिक वृक्ष खिळे मुक्त करण्यात आले आहेत. वृक्षावर खिळे ठोकून अनाधिकृतरीत्या जाहिरात करणा-या २० हून अधिक आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करून दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
वसुंधरा सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘अर्थ विक’ घोषित केला आहे. त्यानुसार ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गंत मनपाकडून पर्यावरण संवर्धन करण्याकरीता विविध उपक्रम राबविले जात आहेत. आज शुक्रवारी (दि. २८) सहा विभागात उद्यान विभागाकडून वृक्ष लागवड करुन अभियानाचा समारोप केला जाणार आहे. या सप्ताहात झाडांवरील खिळे काढण्याची ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असून झाडांवर खिळे ठोकून फलक लावणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा मनपाच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने दिला आहे. तसेच या सप्ताहात सोमवारी (दि. २४) एप्रिल रोजी पंचवटी उद्यान विभाग अंतर्गंत पेठ फाटा येथील नाल्यातील प्लॅस्टिक जमा करुन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्याशिवाय पश्चिम विभाग उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे कृषिनगर जॉगींग ट्रॅक येथे शालेय गटातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद मिळाला. विविध शाळेच्या ५०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ‘माझी जबाबदारी’ हा स्पर्धेचा विषय होता. मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार त्यांच्या निर्देशाने उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान निरीक्षक आणि इतर कर्मचारी यांनी सदरचे उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी परीश्रम घेतले.