त्र्यंबकेश्वरला सलग 21 तास मुसळधार

जनजीवन विस्कळीत; भाविकांची गैरसोय, घरांचे नुकसान

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यात सलग 21 तासांपेक्षा जास्त वेळ मुसळधार झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे शनिवारी (दि. 27) सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रविवारी (दि.28) दुपारी चारच्या सुमारास थांबला. शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांना पूरस्थिती निर्माण झाली. रविवारी सकाळीही तशीच स्थिती अनुभवास आली.
भाविकांना पुराच्या पाण्यातून मार्ग काढणे अवघड झाले होते. मुसळधार आणि रस्त्यांवर वाहणारे पुराचे पाणी, चिखल यांचा सामना करणे कठीण झाले होते. मंदिरांमध्ये पाणी शिरले होते. कुशावर्तात आउटलेटच्या मार्गाने तुंबलेल्या गटारींचे पाणी शिरले, तर रस्त्यांवर वाहणार्‍या पुराच्या पाण्यात गटारींचे पाणी असल्याने भाविकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
त्र्यंबकेश्वर, वेळुंजे आणि हरसूल या तिन्ही मंडलांत विक्रमी पाऊस झाला. पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भात आवणीत पाणी तुंबले, बांध फुटले. ग्रामीण भागात काही बसफेर्‍या थांबवल्या होत्या. तहसीलदार श्वेता संचेती यांनी रविवारी दिवसभर तालुक्यात भेटी दिल्या. घरांची पडझड व शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तालुक्यातील हरसूलसह परिसरात त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. निवासी नायब तहसीलदार सुनील पवार व सहकारी दोन दिवसांपासून तळ ठोकून सर्व माहिती घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *