सव्वा लाख भाविकांचा प्रवास
नाशिक : प्रतिनिधी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर म्हणजे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान. अशातच सध्या श्रावण महिना सुरू असल्याने लाखो शिवभक्त त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक होत असतात. श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारला विशेष महत्त्व असून, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पायी फेरी मारल्याने घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, असा भाविकांचा विश्वास असल्याने लाखो भाविक तिसर्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकनगरीत दाखल होत असतात.
याच शिवभक्तांच्या सोयीकरिता सिटीलिंकच्या वतीने रविवार तसेच सोमवार असे दोन दिवस नियमित बसफेर्यांबरोबर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. याच बससेवेच्या माध्यमातून त्र्यंबकराजा सिटीलिंकला पावला असून, सिटीलिंकला आजपर्यंतचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. सिटीलिंकला सोमवारी (दि. 11 ऑगस्ट) एकाच दिवशी तब्बल 44 लाख 8 हजार 945 इतके सर्वाधिक विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. सोमवारी (दि.11) विविध मार्गांवर नियमित व जादा अशा एकूण सुमारे 2439
बसफेर्या करण्यात आल्या व या
बसफेर्यांचा सुमारे 1 लाख 13 हजार 913 प्रवाशांनी लाभ घेतला व यापूर्वी 2023 च्या श्रावण महिन्यात म्हणजेच दि. 4 सप्टेंबर 2023 रोजी सर्वाधिक 35 लाख 36 हजार 867 इतके सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झाले होते. 2023 नंतर थेट सोमवार, दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी हा 2023 चा विक्रम मोडून तब्बल 44 लाख सर्वाधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. विक्रमी उत्पन्नाच्या माध्यमातून त्र्यंबकराजा सिटीलिंकला पावला असून, सिटीलिंक बससेवेचा लाभ घेतलेल्या शिवभक्त व नियमित प्रवाशांचे सिटीलिंकच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. प्रवाशांनी दाखविलेला असाच विश्वास यापुढेही सिटीलिंकवर कायम ठेवावा, असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.