पावसाचा जाच अन्‌‍ खड्ड्यांचा त्रास

नाशिककरांची हाडे खिळखिळी, वाहनांचेही नुकसान

नाशिक : वार्ताहर
गणेशोत्सवाच्या प्रारंभाबरोबरच सुरू झालेली पावसाची संततधार अजूनही कायम असल्याने शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे पावसाचा जाच तर दुसरीकडे खड्ड्यांचा त्रास अशा दुहेरी संकटात नाशिककर सापडले आहेत. परिणामी नाशिककरांची हाडे खिळखिळी झाली असुन वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
शहरातील अशोकस्तंभापासून त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंत तयार केलेला स्मार्टरोड सोडला तर संपूर्ण शहरातील रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. गंजमाळचा सिग्नल ते शालीमार, दुधबाजार, जिल्हा परिषद, सारडा सर्कल, इंदिरानगर सिग्नल, वडाळा नाका, वडाळा रोड, पेठरोड याठिकाणाहून दुचाकी आणि चारचाकी चालवितांना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. यामुळे एक खड्डा वाचविण्याच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात वाहन आदळते. परिणामी कमरेला बसणाऱ्या झटक्यांमुळे पाठ आणि मानेची हाडे खिळखिळी झाली  असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहे.
खड्ड्यांच्या त्रासामुळे सध्या महापालिका वर्तमानपत्रांच्या हीट लिस्टवर आहे. साधारण: 3 आठवड्यांपूर्वी वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे मनपा आयुक्तांनी युध्दपातळीवर शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. काही प्रमाणात खड्डे बुजविण्याचे कामही सुरु झाले. मात्र पावसाने केलेल्या कामावर पाणी फिरविले. यामुळे मुख्य रस्त्यांपासून उपनगरातील कॉलनी रोडपर्यंत शहरातसर्वत्र रस्त्यांची चाळण झालेली दिसत आहे.
दरवर्षी नाशिक महापालिकेकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात. रस्त्यांवर डांबराचे थरच्या थर लावले जातात. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळा आला की जोरधारेमुळे रस्ते उखडले जातात. याचे सोयरसुतक ना मनपाच्या अधिकाऱ्यांना आहे, ना रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांना. यात नुकसान होते ते सामान्य नाशिककराचे. करोडो रुपये टॅक्स भरणाऱ्या नाशिककरांना चांगल्या रस्त्यांसाठीही संघर्ष करण्याची वेळ आली आहे.
शहराचे आधुनिकीकरण करण्यासाठी ठाण मांडून बसलेली नाशिक महापालिका खड्ड्यांच्या त्रासामुळे नाशिककर संतप्त झालेले आहेत. अनेक संघटना, राजकीय पक्ष यांनी खड्ड्यांभोवती आंदोलनेही केले. मात्र अधिकाऱ्यांना काही केल्या जाग येत नाही हे दुर्देव.
शहरात सर्वत्र संपूर्ण वर्षभर रस्त्यांची कामे चालु असतात, कुठे पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी, तर कुठे मोबाईल नेटवर्कचे जाळे टाकण्यासाठी, तर कुठे वीजेची तार टाकण्यासाठी काम सुरु असते, काही ठिकाणी तर कारण नसतांना मजबुत रस्त्यांवर डांबर टाकले जाते, जेणेकरुन काही दिवसांत ते डांबर उखडून रस्त्याची चाळण होईल. परिणामी पुन्हा रस्ता तयार करावा लागेल. यामुळे पुन्हा कोट्यवधीचा खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांची, ठेकेदारांची धावाधाव सुरु होते. हे चक्र कायम असेच सुरु असते. डोकेदुखी मात्र सामान्य नाशिककरांना होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *