नाशिक महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर स्पष्ट विजय मिळवला आहे. भाजपकडे एक हजार 77 इच्छुक असताना, जागावाटपाच्या अंदाजानुसार शिवसेना शिंदे गटाशी युती करणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी आखलेले डावपेच यशस्वी ठरले आहेत, हे मनपाच्या लागलेल्या निकालांवरून दिसून आले.
यावेळी भाजपने एकूण 72 जागा जिंकत महापालिकेत बहुमत मिळवले, तर शिवसेना शिंदे गटाला 26 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 15 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4, मनसेला आणि अपक्ष उमेदवाराला एक तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या.
विशेष म्हणजे, भाजपने स्वबळावरच सत्ता प्राप्त करून एकनाथ शिंदे गटाला महापालिकेतून दूर ठेवले. त्यामुळे अन्य पक्षांतील काही नेत्यांना उमेदवारी आणि सत्तेसंदर्भात हिरमोडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. एका अर्थाने मंत्री महाजन आणि भाजप यांचे डावपेच यशस्वी ठरल्याचे दिसते.
नाशिक महापालिकेत आगामी काळात भाजपच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार सुरू होणार आहे. विरोधी पक्षांसाठी रणनीतीत बदल करणे आवश्यक असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिक महापालिका निवडणुकांत पावसाळ्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न, वाढती गुन्हेगारी, तसेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंतांवर अन्याय करून आयारामांचे पक्षप्रवेश, तपोवनाचा मुद्दा आदींमुळे भाजपा
बॅकफूटवर जाईल असे वातावरण तयार झाले होते. पक्षांतर्गत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसे प्रयत्नही झाले. त्यामुळे जवळपास 54 जणांची हकालपट्टीही करण्यात आली होती.
नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आयारामांना घेतल्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. शाहू खैरे, विनायक पांडे, यतिन वाघ, नितीन भोसले यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे 25 डिसेंबर 2025 ला भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर मोठा राडा झाला होता. याचवेळी दिनकर पाटील यांचाही पक्षप्रवेश करण्यात आला होता. त्यानंतरही एबी फॉॅर्म वाटपावरून सिनेस्टाइल पाठलाग, फार्महाउसचे गेट तोडण्याच्या घडामोडीही व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती.
दरम्यान, तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावरून रणकंदन माजले होते. त्यावरही मंत्री महाजनांनी 20 हजार झाडे लावून नाशिक हिरवेगार करण्याचा उतारा परिणामकारक ठरला. रस्त्यांवरील खड्ड्यांना व्हाइट टॅपिंग, वाढत्या गुन्हेगारीवर कायद्याचा बालेकिल्ला, अशा सर्वच मुद्द्यांवर उपचाराची मात्रा लावली खरी, त्याहीपेक्षा गोदाकाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून नाशिककरांसाठी मोठ्या विकासकामांच्या घोषणेमुळे भाजपवर पुन्हा एकदा विश्वास नाशिककरांनी टाकला, हे निकालांवरून दिसते.
संंकटमोचक गिरीश महाजन यांनी नाशिकला हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न केले. आंध्र प्रदेशातून 20 हजार झाडे आणून ती लावण्यात आली. या मुद्द्यावरूनही महाजनांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. झाडांच्या पूर्ण देखभालीसाठीही नियोजन केल्याचे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेत
सांगितले होते.
राज ठाकरे यांनी नाशिकमधील सभेत लाकूडतोड्या म्हटले होते. त्याचा समाचार घेत महाजन यांनी, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर बोलत असल्याची टीका होत असली, तरी फडणवीस विकासाशिवाय बोलत नाहीत. विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही. त्यामुळे निवडणुका आल्या की, ते पावसाळ्यातील बेडकासारखे आवाज करतात,’ अशी घणाघाती टीका महाजनांनी केली होती.
नाशिक महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. यात भाजपने 72 जागा मिळवून विजयी घोडदौड केली.
नाशिकमध्ये भाजपाचाच महापौर
शंभर प्लसचा नारा देणारे मंत्री गिरीश महाजनच महापालिका निवडणुकांत धुरंधर ठरले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव वगळता चारही महापालिकांवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महायुती टाळली. त्यामुळे त्यांचे डावपेच यशस्वी झाले आहेत.