वाहतूक मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वाहतूक
बोलठाण : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील कासारीजवळील चांदेश्वरी घाटात सोमवारी (दि.23) मका घेऊन जाणारा ट्रक अवघड उतारावरून चालकाचा ताबा सुटल्याने पुढे कापूसमाल घेऊन जाणार्या ट्रकला व त्यानंतर संरक्षण भिंतीला धडक देत सुमारे 30 फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कापूस भरलेला ट्रक रस्त्यावर पडल्याने वाहतूक मार्ग बंद झाला होता. सोमवारी रात्री 12 ला अपघात होऊन दुसर्या दिवशी सकाळी आठपर्यंत वाहतूक मोकळी झाली नव्हती. यामुळे दिवसभर नांदगावकडे जाणारा रस्ता बंद होता.
सोमवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान कासारीजवळील चांदेश्वरी घाट उतरताना बोलठाणकडून जाणारा ट्रक (एमएच 41 एजी 8653) नांदगावकडे मका घेऊन जात असताना अवघड उतारावर ट्रक चालकाचा ताबा सुटला. त्यावेळी पुढे जात असलेल्या कापूस भरलेला ट्रक (एमएच 20 जीसी 7329) या वाहनास जोरदार धडक देऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकला व संरक्षक भिंत तोडून तीस
फूट दरीत जाऊन कोसळला. तसेच दुसरा अपघातग्रस्त कापसाचा ट्रक रस्त्यावर जागीच उलटल्याने दिवसभर वाहतूक मार्ग बंद झाला. त्यामुळे दिवसभर अनेक वाहनांची तारांबळ उडाली. अनेक वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. ऐन अवघड वळणावर अपघात झाल्याने एका अपघातग्रस्त मालवाहतूक ट्रक मागे आणखी काही अवजड वाहने उभे होती. चांदेश्वरी घाट कठीण वळणाचा व मोठ्या प्रमाणात उतार असल्याने अनेक अरुंद व अवघड वळणे आहेत. रस्तेमार्गावर मोठमोठे खड़े पडलेले असल्याने बहुतेक वेळा या घाटातून जाणार्या अनेक चालकांची धांदल उडते. तसेच अनेक वर्षांपासून चांदेश्वरी घाटमार्ग विकासासाठी व घाटमाथा परिसरातील पक्क्या रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याबाबत भावना नागरिकांनी विविध माध्यमांतून व्यक्त केली आहे.
Truck falls into a valley at Chandeshwari Ghat; No casualties were reported