पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली
नाशिक : प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत भक्तीचा महापूर आल्याचे चित्र होते. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच शहर परिसरात असलेल्या महादेव मंदिरांत दर्शनासाठी रांग लावली होती. विशेष करून, सोमेश्वर, कपालेश्वर, तीळभांडेश्वर, राजराजेश्वर, महादेव मंदिर, नीळकंठेश्वर व त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांंची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर ट्रस्टतर्फेही भाविकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून विविध सुविधा सज्ज ठेवल्या होत्या. शहर परिसरात असलेल्या महादेव मंदिरांत श्रावणी सोमवारनिमित्त विधिवत पूजा, महाअभिषेक, रुद्रशभिषेक, मंत्रपठण व महाआरती करण्यात आली.
दरम्यान, पहाटेपासून भाविकांची मंदिरांत गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत कपालेश्वर, सोमेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले
ठेवले होते. एक ते दीड किलोमीटरची रांग दर्शनासाठी लागली होती. मंदिर ट्रस्ट, सेवाभावी संस्था व सामाजिक संस्थांतर्फे भाविकांना साबूदाणा खिचडी, केळी या प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर परिसरात व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात
आला होता.
फराळाच्या पदार्थांचे वाटप
शहरातील शिवमंदिरांत फराळाच्या पदाथार्ंचे वाटप करण्यात आले. सोमेश्वर व कपालेश्वर मंदिरांत ट्रस्टसह राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, विविध फाउंडेशन, दानशूर व्यक्तींकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.