खून करून पसार झालेल्या दोघा आरोपींना दोन तासांत अटक

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलिस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एका 25 वर्षीय तरुण कंपनी कामगाराचा धारदार कोयत्याने खून केल्याची घटना घडली आहे या प्रकरणातील दोघा संशयितांना अंबड पोलीसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची उल्लेखनीय कामगिरी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे.
शनिवारी (दि. 28 जून 2025 रोजी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास स्वामीनगर, समाजमंदिरासमोर रोडवर, प्रशांत सुभाष भदाणे (वय 25, रा. ओमकारेश्वर महादेव मंदिराजवळ, स्वामीनगर, अंबड, नाशिक) यास सुफियान अनिस अत्तार (रा. शामसुंदर रो-हाउस नं. 6, अंबड) आणि त्याचा मित्र विक्की बंटी प्रसाद (रा. माउली लॉन्सजवळ, श्री स्वामी केंद्रामागे, अंबड) यांनी जुन्या वादातून धारदार शस्त्राने डोक्यावर, चेहर्‍यावर आणि डाव्या डोळ्याच्या खाली वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात प्रशांत भदाणे याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलीस अंमलदार मयूर तुळशीदास पवार यांनी फिर्याद दिल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन
फुलपगारे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली गेली. सापळा रचून अवघ्या दोन तासांत संशयीत आरोपी सुफियान अनिस अत्तार (वय 18 वर्षे 7 महिने) व विक्की बंटी प्रसाद (वय 20) या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात
आले.
दरम्यान, मृत प्रशांत भदाणे हा मूळचा जळगाव जिल्ह्यात अमळनेर धरणगाव गावाजवळील पिलखेडा येथील रहिवासी आहे. तो सध्या अंबड औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मीनगर परिसरात राहत आहे. अंबड येथील कंपनीत कायमस्वरूपी वर्कर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व बहीण असून सर्वसाधारण कुटुंबातील होता. त्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
ही कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, निरीक्षक सचिन खखैरनार (गुन्हे), सपोनि किरण रौंदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बागूल, पोउनि झनकसिंग घुनावत, पोउनि नितीन फुलपगारे, पोउनि संदेश पाडवी, परि. पोउनि योगेश साळुंखे राहुल जगझाप, गुंड, मयूर पवार, सागर जाधव, प्रवीण राठोड, अनिल गाढवे, सचिन करंजे, समाधान शिंदे, संदिप भुरे, दीपक निकम, योगेश शिरसाठ, राकेश पाटील, विष्णू जाधव, गणेश कोठुळे, संदिप डावरे, तुषार मते, गणेश झनकर, उल्हास गांगुर्डे, शिवाजी मुंजाळ, गजानन पवार आदींनी केली आहे.
याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *