ज्ञानेश्वरनगर परिसरात दोन समाजकंटकांनी केली घरावर दगडफेक

सिडको : विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वरनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत दोन समाजकंटकांनी घरावर दगडफेक करत बिअरच्या बाटल्या फोडून दहशत माजवल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. संबंधित संशयितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर विजय जाधव (रा. ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा), प्रशांत खताळे आणि सागर डेमसे हे तिघे पूर्वी मित्र होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यात किरकोळ वाद सुरू होता. या वादानंतर सागर जाधव याने संपर्क तोडल्याने डेमसे आणि खताळे यांना राग आला. त्याच रागातून दोघांनी मद्यधुंद अवस्थेत हातात धारदार शस्त्रे घेऊन मध्यरात्री सागर जाधव याच्या घरावर दगडफेक केली. यावेळी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या, तसेच बिअरच्या बाटल्या फोडून जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली, अशी तक्रार करण्यात आली आहे.
याप्रकरणी सागर जाधव याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या घटनेतील संशयित सागर डेमसे याच्याविरोधात अंबड, सातपूर तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रकरणांत तो कारावास भोगून आल्याने परिसरात वारंवार हाणामारी व दहशतीचे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींविरोधात कडक कारवाई करून परिसरातील शांतता राखावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *