वाकद येथील शेळ्या चोरी प्रकरणातील दोघे जेरबंद
शिरवाडे ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने लासलगाव पोलिसांनी आरोपींना केली अटक
लासलगाव : समीर पठाण
निफाड तालुक्यातील वाकद(देवगाव फाटा)शिवारातून शेळ्याची चोरी करणारे कोपरगाव तालुक्यातील दोन गुन्हेगार लासलगाव पोलीस पथकाने शिरवाडे ग्राम सुरक्षा दलाच्या सहकार्याने जेरबंद केले आहेत.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात दि ८ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता अशी माहिती सपोनी भास्करराव शिंदे यांनी दिली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार द्रोपदाबाई बाजीराव शिंदे राहणार देवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि ४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री एक वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या पत्र्याच्या शेडमधून आरोपी बाळकृष्ण गंगाधर कुराडे(वय ४६)व कृष्णा पेव्हल माळी(वय ३५) दोन्ही राहणार धामोरी तालुका कोपरगाव यांनी तीस हजार रुपये किमतीच्या सहा शेळ्या फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या होत्या,यामध्ये काळ्या,तांबड्या आणि सफेद रंगाच्या काठेवाडी जातीच्या शेळ्यांचा समावेश होता.याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
या घटनेनंतर गुन्ह्याचा तपास करत असताना लासलगाव पोलिसांनी अनुक्रमे दि २४ व २५ डिसेंबर २०२५ रोजी बाळु गंगाधर कुऱ्हाडे(वय ४६)आणि कृष्णा पेव्हल माळी(वय ३५) दोन्ही राहणार धामोरी, ता. कोपरगाव) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी या शेळ्यांची चोरी केल्याची कबुली दिली.आरोपी बाळु कुऱ्हाडे याच्याकडून चोरीसाठी वापरलेली १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची विना नंबरची कावासाकी मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
या कारवाईत शिरवाडे ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी लासलगाव पोलिसांना मोलाचे सहकार्य केले असून लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोहवा ए. एन. मुरडनर यांनी या तपास मोहीमेत कामगिरी बजावली.या मोहिमेत शिरवाडे ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य दीपक चिताळकर,श्रीकांत चिताळकर,गणेश चिताळकर,नितीन शिंदे,विशाल पवार आणि संभाजी चिताळकर यांनी पोलिसांना मोलाची मदत केली.