पंचवटी : वार्ताहर
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटना सातत्याने घडत आहेत. बुधवारी (दि. 25)देखील ओमकारनगरमधील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर आणि एसटी वर्कशॉपजवळील राजमान्य सोसायटीजवळ अवघ्या काही वेळाच्या अंतरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत कल्पना अनिल माळोदे (वय 52, रा. ओमकारनगर, मखमलाबाद-म्हसरूळ लिंक रोड) आणि सुनंदा भाऊसाहेब काळे (45, रा. राजमान्य सोसायटी नंबर 3, ए विंग, यशोदानगर, पेठरोड, एसटी वर्कशॉपसमोर) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दि. 25 जून रोजी सायंकाळी 7.15 ते 7.30 च्या सुमारास कल्पना अनिल माळोदे या बाजूलाच असलेल्या बाजारात भाजी घेण्यासाठी गेल्या असता, ओमकारनगर, विठ्ठल मंदिरासमोरील आशिष सोसायटीजवळून भाजी घेऊन पायी चालत येत असताना समोर आलेल्या मोटारसायकलवरील दोघे मोटारसायकल उभी करून मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी त्या चालत असताना त्यातील एकाने निळा शर्ट, तर गाडी चालविणार्या एकाने पांढरा शर्ट, डोक्यात हेल्मेट घातले होते. त्यातील निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्याने पायी येत गळ्यातील 52 हजार रुपयांची सात ते आठ ग्रॅमची सोन्याची पट्टी पोत खेचून पळत जात त्याच्या मित्राच्या स्कूटीवर बसला. त्यावेळी त्याच्या पाठीमागे पळत जात चोर चोर असा आरडाओरड केला. त्यांच्या मोटारसायकलचा नंबर पाहिला, परंतु तो जोरात असल्याने मला त्या गाडीचा नंबर दिसला नाही आणि ते दोघे ओमकारनगरच्या दिशेने पळून गेले.
सायंकाळी पावणेआठच्या सुमारास सुनंदा भाऊसाहेब काळे यांच्या गळ्यातील एक लाख 50 हजार रुपयांची दोन तोळे ग्रॅम वजनाचे सोन्याची पट्टी मंगळसूत्र खेचून पोबारा केला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे तपास करत आहेत.