3 चोरीच्या गाड्या जप्त
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार व पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र. 1 ने मोठी कामगिरी बजावली आहे.
दि. 12 मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने मोतीवाला कॉलेज परिसरात सापळा रचून एक विधिसंघर्षित बालक ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची अॅक्टिव्हा मोपेड हस्तगत झाली. चौकशीदरम्यान त्याने आणखी दोन मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी दुसर्या एका विधिसंघर्षित बालकाच्या घरावर छापा टाकून दोन मोटारसायकली हस्तगत केल्या. या दोघांकडून एकूण 60 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोहवा नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, रोहिदास लिलके, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, पोना विशाल देवरे, पोअं अमोल कोष्टी, मपोअं मनीषा सरोदे यांचा समावेश होता.
दोन्ही विधिसंघर्षित बालके व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.