सिडको : विशेष प्रतिनिधी
एमआयडीसी, अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन बालके रस्ता चुकून झाडांजवळील गवतात रडत बसलेली आढळली. सोमवारी (दि. 30 जून) सकाळी दहा वाजता ही मुले कामगारांच्या निदर्शनास आली. त्यांनी दोन्ही मुलांना पोलीस चौकी, चुचांळे येथे आणून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बालकांचा शोध घेऊन त्यांंना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
ही बालके अंदाजे तीन व दोन वर्षांची असून, त्यांना स्वतःचे नाव, पत्ता सांगता येत नव्हता. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, मुक्तेश्वर लाड, हवालदार सोनवणे, साळवे, पोलीस शिपाई दिवे व सूर्यवंशी यांनी दोन पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली. परिसरातील नागरिकांकडे विचारपूस करण्यात आली. मात्र, सुरुवातीला कोणतीच माहिती मिळाली नाही. नंतर परिसरातील कंपन्यांमध्ये जाऊन मुलांचे फोटो दाखवून तपास केला असता, एका कंपनीत मुलांची आई काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित महिलेला चौकीत बोलावून ओळख पटवून दोन्ही मुलांना तिच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीतून समजले की, मुलांचे आई-वडील दोघेही कामावर जात असल्यामुळे मुले घरी एकटी
राहत होती.