सहधर्मदाय आयुक्त कार्यालयातील
दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
सहधर्मदाय उपायुक्त कार्यालयातील दोन लिपिकांना दहा हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. न्याय लिपीक (निरीक्षक) सुमंत सुरेश पुराणीक आणि लघुलेखक संदीप मधुकर बावीस्कर, रा एन 42, जे.सी. 2/2/5 रायगड चौक, सिडको अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत.तक्रारदार यांचेकडे नवीन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणूक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला विहीत वेळेत पाठविले बद्दल व येणा-या पुढील सुनावणीचे कामकाजात अडथळा न आणता सदर कामकाज जलद गतीने करुन देण्याच्या मोबदल्यात सुमंत सुरेश पुराणीक यांनी दिनांक 23/09/2024 रोजी प्रथम 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडी अंती 15000/- रुपये लाचेची मागणी केली. लाच मागणीस बाविस्कर यांनी प्रोत्साहन दिले. लाच रक्कम काल पुराणिक यांनी त्यांचे शासकीय कार्यालयात पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द मुंबईनाकापोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सापळा अधिकारी नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चैधरी,
पोलीस शिपाई अनिल गांगोडे यांनी ही कारवाई केली.पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर’ अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.