विंचूर : येथून जवळच असलेल्या विष्णूनगर येथे दोन घरफोड्या होऊन दागिन्यांसह रोख रक्कम चोरी गेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विष्णूनगर येथील आण्णा वामन घायाळ हे दि.14 रोजी रात्री साडेबारा वाजेपर्यंत टीव्ही बघून कुटुंबांसह घराच्या ओट्यावर झोपले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी अण्णा घायाळ यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लहान मुलाचे कानातील सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या तोळबंद्या, सोन्याचे ओमपान तसेच बारा हजार रोख रक्कम देऊन पोबारा केला.दरम्यान, चोरट्यांनी मागील दरवाजाजवळ हल्ला करण्याच्या उद्देशाने दगडगोटे जमा करून ठेवले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा शिवाजी बंडू घायाळ यांच्या वस्तीवर वळविला.शिवाजी घायाळ यांचाही पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून किचनमधून आत प्रवेश केला. कपाटमधील तीन हजार रुपये घेऊन पोबारा केला. दोन्ही कुटुंब सकाळी झोपेतून उठल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आण्णा घायाळ यांनी पोलीस पाटील रामकिसन सुराशे यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी लासलगाव पोलीस ठाण्यास चोरीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.