डांगसौंदाणे शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार; भीतीमुळे ऊसतोड बंद
डांगसौंदाणे : प्रतिनिधी
डांगसौंदाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. परिसरातील केळझर फाट्यावर, खोकलाई माता मंदिराजवळ प्रकाश पंडित यांच्या शेतात बिबट्याची मादी व दोन ते तीन बछडे ऊसतोडणी मजुरांना दिसल्याने त्यांनी तेथून धूम ठोकली व ऊसतोड बंद केली.
सविस्तर माहिती अशी की, डांगसौंदाणे परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे मागे साकोडा, वड्याचे पाढे तसेच डांगसौंदाणे येथे बकर्या व कुत्रे ,मेंढरं या बिबट्याने फस्त केले. वन विभागाने तीन चार ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते व त्या ठिकाणी बिबट्याला पकडून इतरत्र सोडण्यात आले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व जखमी झालेल्या बकर्या, गुराढोरांच्या पंचनामा करून वनविभागास भरपाईसाठी पाठवले आहेत.
खोकलाई माता मंदिरा शेजारील प्रकाश पंडित यांच्या शेतात आरम नदी काठावर राज्यमार्ग 19 लगत हे क्षेत्र असल्याने या क्षेत्रामध्ये दोन एकरावर ऊस आहे. ऊसतोडणीस मजूर ऊस तोडत असताना मजुरांना अचानक बिबट्याचे तीन ते चार दिवसाचे बछडे आढळून आल्याने प्रथम या मजुरांनी या पिलांना जवळ घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. जवळच बिबट्याची मादी आढळल्याने तिने मोठ्याने डरकाळी ठोकल्याने या मजुरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. मजुरांमध्ये घबराट निर्माण झाली असून, ऊसतोड बंद करण्यात आली आहे, या शेतात जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. वन विभागाच्या कर्मचार्यांच्या मते दोन-तीन दिवसांत बिबट्या आपल्या बछड्यांना घेऊन इतरत्र स्थलांतर करेल, असा आमचा अनुभव आहे. तोपर्यंत या ठिकाणी कोणी जाऊ नये, असे वन कर्मचारी पवार यांनी सांगितले.
याबाबत द्वारकाधीश कारखान्याच्या कर्मचार्यांना सूचना केल्या. कर्मचार्यांनी तात्काळ द्वारकाधीश कारखान्याच्या शेतकी विभागास कळविले आहे. शेतकी विभागाने तसे पत्र वन विभागास दिले असून, लवकरच या ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल. मात्र वन विभागाची अडचण अशी आहे की दोन ते तीन दिवसाचे बछडे असल्याने मादी पकडली गेली व दुसरीकडे सोडण्यात आली तर या बछड्यांचे करायचं काय? याबाबतही वरिष्ठांची चर्चा सुरू आहे, तरीही लोकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याची आवाहन वन कर्मचारी पवार यांनी केले आहे.
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावा
यापूर्वी साकोडे येथील राजेंद्र गांगुर्डे, वड्याचे पाढे येथील तुकाराम बागुल व देवराम पवार यांच्या शेतातून तीन बिबटे व आणखी एका शेतातून बुंधाटे येथून बिबट्यास पिंजरा लावून पकडण्यात आले आहे. किशोर दत्तात्रय चिंचोरे यांच्या शेतातून बोकड बिबट्याने फस्त केल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी चिंचोरे यांनी केली. प्रकाश पंडित यांच्या शेतात या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा व पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे. परिसरात बिबट्याची मादी व बछडे आहेत, हा रस्ता मोठा रहदारीचा असून डागसौंदाणे-सटाणा राज्य मार्ग 19 वर क्षेत्र असल्याने डांगसौंदाणे गावापासून अवघ्या तीनशे मीटरवर हे क्षेत्र असल्याने डांगसौदाणे वासीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.