पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांना लुबाडले

दोन भामट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड केली लंपास; उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात महिलेसह ज्येष्ठ नागरिकाकडून पोलीस असल्याची बतावणी करून हातचलाखीने सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत उपनगर पोलीस ठाण्यातील टागोरनगर परिसरात राहणार्‍या जागृती अविनाश टिळे (रा. ऋषिप्रसाद बंगला, टागोरनगर, नाशिक) या सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घराजवळील सिद्धार्थ नगर परिसरात राजा ज्वेलर्सजवळ उभ्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येऊन थांबत स्वतःला ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगून बतावणी केली. बोलण्यात गुंतवून या तोतया पोलिसांनी हातचलाखीने फिर्यादी महिलेच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, तसेच पर्समधील रोख रक्कम काढून पसार झाले. या फसवणुकीत 20 हजार रुपये किमतीची सुमारे 4 ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, 10 हजार रुपये किमतीची सुमारे 02 ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी तसेच 10 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांंविरुद्ध चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
दरम्यान, दुसर्‍या घटनेत. आर्टिलरी सेंटर रोड परिसरात भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी प्रकाशचंद सुरजमल सिसोदिया (वय 76, , रा. प्लॉट नं. 15, अर्हम विलाज, जैन कॉलनी, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) दुपारी सुमारे 2.30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराजवळ जैन कॉलनीच्या कॉर्नरवर, आर्टिलरी सेंटर रोड येथे उभे होते. त्यावेळी एका मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखींंनी त्यांच्याजवळ येऊन थांबत संवाद साधला. बोलण्यात गुंतवून या तोतया पोलिसांनी हातचलाखीने फिर्यादीकडील मौल्यवान दागिने व रोख रक्कम काढून घेत फसवणूक केली व घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेत एकूण दोन लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. यामध्ये 50 हजार रुपये किमतीची सुमारे दहा ग्रॅम वजनाची डायमंडजडीत सोन्याची अंगठी, एक लाख 75 हजार रुपये किमतीची सुमारे 35 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तसेच पाच हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस हवालदार लखन व गोसावी करीत आहेत.

Two people were robbed by pretending to be policemen.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *