सुळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
सिन्नर ः प्रतिनिधी
सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 16) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वार्यासह झालेल्या जोरदार पावसाने दोघांचा बळी घेतला. नळवाडी येथील 35 वर्षीय तरुण शेतकरी पावसात विजेच्या तारेचा शॉक लागून विहीर पडून मृत झाला. रामदास दगडू सहाणे (वय 35, रा. नळवाडी) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. सिन्नरमधील त्रिशुळी परिसरात वीज पडून बारावर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. विकास रामनाथ बर्डे (वय 12) असे मृत मुलाचे नाव आहे.
नळवाडी येथील रामदास सहाणे हे दुपारी वादळी वार्यासह पाऊस सुरू असताना विहिरीजवळून जात असताना त्यांना विजेच्या तारेचा धक्का लागला आणि त्यातच ते स्वतःच्या मालकीच्या विहिरीत पडून मृत झाले.
सिन्नरच्या मापारवाडी रोड परिसरात कैलास गोरे यांची वीटभट्टी असून, संध्याकाळी 5 ते 5.15 वाजेच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसात त्यांच्या वीटभट्टीवरील मजूर कागदाने वीटभट्टी झाकण्याचे काम करत होते. या मजुरांपासून अवघ्या 6-7 फुटांवर उभा असलेल्या विकास रामनाथ बर्डे या बारावर्षीय मुलावर वीज कोसळली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला. वीटभट्टीमालक कैलास गोरे यांनी तत्काळ स्वतःच्या तोंडाने श्वास देऊन या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रतिसाद देत नसल्याने त्यास तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यात आला.
तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांत वादळी वार्यासह कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसला.
बारागावपिंप्री, पाटपिंप्री परिसरातही ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात
जोरदार पाऊस झाला. मात्र, सुळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पावसाने
अक्षरशः तांडव केले. अनेक शेतकर्यांच्या शेताचे बांध फुटून शेतांतून
मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.