टायर फुटल्याने बिंग फुटले
सिन्नर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे टायर फुटून अपघात झाला. अपघाताच्या मोठ्या आवाजाने स्थानिक तरुण महामार्गावर मदतीसाठी धावले आणि अवैध गोमांस वाहतुकीचे बिंग फुटल्याची घटना मंगळवारी (दि.८) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे १ हजार किलो गोमांस जप्त करत पोलिसांनी त्याची विल्हेवाट लावली. वावी पोलिसात अवैध गोमांस वाहतूक करणाऱ्या कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकारामुळे समृध्दी महामार्गाने मुबंईच्या दिशेला होत असलेल्या अवैध गोमांस वाहतुकीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. वैजापूरकडून मुंबईच्या दिशेने समृध्दी महामार्गाने संशयित इरफान इक्बाल शेख (३६) हा युवक त्याच्या ताब्यातील टायटो करोला कार (एम. एच. ०३ ए. एफ. ०४६३) मध्ये सुमारे १ हजार किलो गोमांस घेऊन निघाला होता. कार सिन्नर तालुक्यातील सायाळे शिवारात आल्यानंतर चॅनल नंबर ५३५ जवळ कारचे डाव्या बाजूचे पुढचे टायर फुटले. त्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. गोमांसच्या अति वजनामुळे टायर फुटल्याचा अंदाज आहे. अपघात झाल्यानंतर जोराचा आवाज झाल्याने परिसरातील शेतकरी समृध्दी महामार्गावर मदतीसाठी धावले. त्यावेळी या कारमध्ये धक्कादायक माहिती उजेडात आली. घटनेची माहिती मिळताच समृध्दी महामार्गाच्या बचाव पथकाचे प्रमुख मिलिंद सरवदे यांच्यासह वावी पोलीस ठाण्याचे हवालदार देवीदास माळी, विक्रम लगड, किरण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कार चालकाला किरकोळ दुखापत झाली होती.
—
खड्डा खोदून गोमांसची विल्हेवाट
वावी पोलिसांनी अपघातग्रस्त कार वावी पोलीस आणली व कारमधील गोमांस ची खड्डा खोदून विल्हेवाट लावली. अवैध गोमांस वाहतूक करणारा कार चालक संशयित इरफान इक्बाल शेख(३६) रा. अंधेरी पूर्व, मुंबई याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवीदास माळी, विक्रम लगड अधिक तपास करीत आहेत.