नाशिक/ ओझर : वार्ताहर
पहिला दिवा त्या देवाला ज्यांच्यामुळे देवळातील देव शिल्लक आहेत, या संकल्पनेंतर्गत रामशेज गडावर सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक व सकल मराठा परिवार नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव व मशाल महोत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्य रक्षणासाठी प्राणार्पण करणार्या मावळ्यांना दिव्यांच्या व मशालींच्या तेजातून वंदन करण्यासाठी रविवारी गडावर शेकडो दुर्गसेवक, शिवप्रेमी व गडप्रेमी एकवटले होते. महोत्सवात रामशेज गडावर 51 मशाली, 101 टेंभे व 1001 दिवे लावून गड उजळून निघाला. सुरुवात गड पायथ्याच्या आशेवाडी गावातून शिवरायांची पालखी काढून करण्यात आली. याप्रसंगी गोंधळीच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवरायांवरील पोवाड्यांनी वातावरण शिवमय केले. गडावर पोहोचून सर्वांत आधी गड स्वच्छता करून रांगोळ्या काढून महाद्वार फुलांनी सजविण्यात आले. गडावर पुन्हा शिवरायांच्या पालखीची मिरवणूक काढून ध्वजपूजन व गडपूजन करण्यात आले. गडावरील शिवरायांच्या मूर्तीची पूजा माताभगिनींच्या हस्ते करून मूर्तीवर उपस्थितांनी पुष्पवर्षाव करून महाराजांचा जयघोष करून वातावरण दणाणून सोडले. याप्रसंगी शिवव्याख्यात्या साक्षी ढगे व शिवव्याख्याते समाधान हेगडे पाटील यांचे शिवव्याख्यान झाले. त्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी मर्दानी खेळ दाखवून शिवकाळ ताजा केला. या कार्यक्रमासाठी लहानथोरांपासून सर्वांनीच हजेरी लावली व या महोत्सवाला सुख सोहळा बनवले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल मराठा परिवाराची टीम व सुधीर पौळ, गोविंद जाधव पाटील, प्रवीण साळुंके, हेमंत भोईटे, अनिकेत गायकवाड, हेमंत पाटील, केतन शिंदे, विकास कोकणे, किरण नळगे, दर्शन जाधव, आकाश पिळोदकर व सर्व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागाच्या दुर्ग सेवकांनी नियोजन केले.