नाशिक : प्रतिनिधी
यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. शहराचा पारा चाळीशी पार गेला. उन्हांच्या तीव्र झळांनी अंगाची काहिली होत आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक वेगवेगळे उपाय करत आहे. सनकोट , गॉगल ,टोपी ,स्टोल यांच्या वापरासह थंड पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेष करून आइस्क्रीमच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळापासून काही प्रमाणात थंडावा मिळावा यासाठी शहरातील आइस्क्रीम पार्लर गर्दीने फुलून जात आहेत. वाढलेल्या उष्णतेमुळे बच्चेकंपनीसह अबालवृध्दही आइस्क्रीम खाण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. वाढलेल्या मागणीमुळे आइस्क्रीम व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आइस्क्रीम व्यवसायालाही मोठा फटका बसला.कोरोनापासून बचावासाठी नागरिकांकडून बाहेरचे पदार्थ खाणे टाळले जात होते. तसेच थंड पदार्थही खाण्याचे टाळण्यात येत होते .परिणामी आइस्क्रीम व्यवसायिकांना कोरोनामुळे मोठे अर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.मात्र यंदा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने मार्च महिन्यापासूनच आइस्क्रीमची मागणी वाढली आहे.तसेच लग्नसराईमुळेही आइस्क्रीमला चांगलीच मागणी आहे.
या आइस्क्रीमला जास्त मागणी व्हॅनिला बटरस्कॉच चॉकलेट ट्रूटी फ्रुटी
मागील वर्षीच्या तुलनेत आइस्क्रीमच्या मागणीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र आइस्क्रीम बनवण्यासाठी लागणार्या सर्वच पदार्थाचे दर वाढल्याने काही प्रमाणात आइस्क्रीमच्या दरात वाढ करण्यात आली आहे.कडक उन्हाळा आणि लग्न सराईमुळे मागणी अधिक आहे. आशिष नहार (सचिव,इंडियन आइस्क्रीम मॅनिफॅक्चर असोसिएशन )