त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर एका अनोळखी महिलेचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे. सुमारे 40 ते 45 वयोगटातील ग्रामीण भागातील पेहराव असलेल्या महिलेचा मृतदेह येथील हॉटेल संदीपच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीलगत पडलेला होता.
मृत महिलेचा दगडाने ठेचून मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. अनोळखी असलेली महिला भंगार अथवा कचरा वेचणारी असावी असे दिसते. बुधवारी सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले व त्यांनी त्र्यंबक पोलिसांत कळवले. त्यानंतर तातडीने पोलीस पथक दाखल झाले. मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तेथील अहवाल आल्यानंतर या घटनेवर प्रकाश पडण्यास मदत होईल. त्र्यंबक पोलिसांत अज्ञाताच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाच्या जवळच शासकीय विश्रामगृह आहे. तसेच काही अंतरावर वाहे गुरू लंगर आहे. तेथे दोन वेळेला जेवण देण्यात येते. त्र्यंबकेश्वर परिसरातील निराधार, भिक्षेकरी या भागात जेवणासाठी येत असतात व जवळपास वास्तव्य करतात. यापूर्वी एका साधूच्या वेशातील भिक्षेकर्याची हत्या घडली होती. त्यातील संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडले होते. या घटनेत एका महिलेचा निर्घृणपणे खून झाला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी व सहकारी पुढील तपास करीत आहेत.
Unidentified woman stoned to death in Trimbakeshwar