विरोधकांची एकजूट

निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्यातील विरोधी पक्ष एकवटले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी व भारतीय) या पक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीत नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विरोधकांना साथ लाभली आहे. 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढून विरोधी पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी एस. चोकलिंगम, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने सलग दोन दिवस चर्चा केली. दुबार नावे, एका पत्त्यावर अनेक नावे, काही सार्वजनिक ठिकाणांच्या (शौचालय) पत्त्यावर मतदारांची नोंदणी, वय, लिंग, नाव यात बदल इत्यादी घोळ या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. पहिल्या भेटीत निवडणूक अधिकार्‍यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. अधिकार्‍यांनी एक दिवस मागून घेतला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा चर्चा करण्यात आली. दोन दिवस चर्चा करण्यात आल्यानंतरही निवडणूक अधिकार्‍यांनी विरोधकांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले आणि ‘आपलंच खरं’ यावर निवडणूक अधिकारी ठाम राहिले. याचमुळे निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मनसेसह विरोधकांनी मुंबईत प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विरोधी पक्षांचे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक दणाणून सोडले. मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी लोकलने प्रवास करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. वय झाले असले, तरी आपण थकलेलो नाही, हेच शरद पवार यांनी या मोर्चात दाखवून दिले. मोर्चेकर्‍यांंनी सत्याचा जयघोष केला. मतचोरी थांबवा, बोगस मतदारांचं बोगस रूप उघड करण्यासाठी सत्याचा मोर्चा, लोकशाही वाचवा संविधान वाचवा, ही सत्तेची लढाई नाही सत्याची लढाई आहे, अशा विविध आशयांचे बॅनर हाती घेतलेले कार्यकर्ते मोर्चात सहभागी होते. त्यांनी मुंबई दणाणून सोडली. या मोर्चातून निवडणूक आयोगाला थेट इशारा देण्यात आला. बोगस मतदान, मतचोरी, मतदार यादीतील घोळ या विरोधात सत्ताधारी सोडून सगळे विरोधक एकत्र आले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनी जागे झाले पाहिजे. ज्या ठिकाणी मतचोर दिसेल त्या ठिकाणी त्याला लोकशाही पद्धतीने फटका. भाजपासह महायुतीने ठिणगी बघितली, पण वणवा कधीही पेटेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला. महाविकास आघाडीसह मनसेने आयोजित केलेल्या सत्याचा मोर्चात उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आयोजित सभेत ठाकरे बंधू एकत्र आले. यावेळी ठाकरे बंधूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे लोकही मतदारयादीत दुबार मतदार असल्याचे बोलत आहेत. मग निवडणूक घ्यायची घाई का आहे? असा सवाल करत मतदारयाद्या पारदर्शक केल्यानंतर निवडणूक घ्या. त्यानंतरच निवडणुकीत यश कोणाचे, अपयश कुणाचे, हे मान्य करू, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला दिले. दुबार मतदार दिसल्यास त्याला बडवा, असा सूचक संदेशही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. सत्तेत राहण्यासाठी सत्तेचा गैरवापर होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मतचोरीविरोधात राज्यातील जनता एकत्र आली तसेच मतांचा अधिकार व लोकशाहीतील अधिकार वाचवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले. विधानसभा निवडणुकीनंतर जे प्रकार समोर आले, ते बघता लोकशाहीला धक्का बसला आहे. मतचोरीविरोधात लढा देण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो ती एकजूट जबरदस्त आहे, असे पवार म्हणाले. सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही, तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. मुंबईत काढण्यात आलेल्या या मोर्चात केवळ मुंबईतील नागरिकच सहभागी झाले नव्हते, तर राज्याच्या विविध भागांतून नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी, मतदारयाद्यांतील घोळ, बोगस मतदार, मतदान यंत्रात फेरफार इत्यादी मुद्दे उपस्थित केले. तेच मुद्दे राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज ठाकरे आता राहुल गांधी यांची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे विरोधकांना बळ आले आहे. तेच बळ मोर्चात दिसले. निवडणूक सदोष मतदारयाद्या करून, मतदारयाद्यांत घोळ करून, मतदानयंत्रांत फेरफार करून निवडणूक आयोग सत्ताधार्‍यांना मदत करत आहे, हे राज्यातील जनतेच्या मनावर ठसविण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल सत्ताधारी पक्षांना घवघवीत यश देणारे लागले तर विरोधक शंका उपस्थित करतील याविषयी शंका नाही. निवडणूक आयोगाच्या विरोधात एकत्र आलेले विरोधक भविष्यात आणखी आक्रमक होतील, हेच सत्याचा मोर्चा सांगून जात आहे. या मोर्चावर भाजपाने अपेक्षेप्रमाणे टीका केली. मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात होता, तरी तो भाजपा आणि सत्ताधार्‍यांच्या विरोधात होता. याचे कारण म्हणजे निवडणूक आयोग भाजपाला मदत करत असल्याचा विरोधकांचा थेट आरोप, हेच आहे. सत्याचा मोर्चाला विरोध म्हणून गिरगाव चौपाटीजवळील उद्यानात भाजपाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. भाजपाला मतदार याद्यांतील घोळ मान्य आहे, असा संदेशही या मूक आंदोलनातून जाऊ शकतो. विरोधकांचा मोर्चा आणि आणि भाजपाचे मूक आंदोलन यातून लोकांनी काय बोध घ्यायचा तो घ्यावा. पण निवडणूक आयोगाच्या विरोधात रान उठविण्यात विरोधक काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. सत्याचा मोर्चा तेच सांगून जाणारा आहे. विरोधक एकत्र आले की, सत्ताधार्‍यांना भीती वाटते. भाजपाचे मूक आंदोलन त्याच भीतीपोटी होते, असेही दिसत आहे. बरीच चर्चा आणि गाजावाजा झालेला सत्याचा मोर्चा पार पडला. यानिमित्ताने विरोधकांची एकजूट दिसली. पण मोर्चावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांचाच प्रभाव होता. मुंबईत मोर्चा असल्याने या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत होता. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह डावे पक्ष, काँग्रेस व इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत नव्हते. कारण त्यांची मुंबईत म्हणावी तितकी ताकद राहिलेली नाही. पण नेत्यांची एकजूटदेखील काही कमी नव्हती. मोर्चा शक्तिप्रदर्शनासाठी नव्हता, तर निवडणूक आयोगाच्या विरोधात असल्याने विरोधी नेत्यांना हजेरी लावणे भाग होते. ठाकरे बंधूंचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीवर असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या मोर्चातून ऊर्जा दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवूनही काँग्रेस नेत्यांचा फारसा उत्साह नव्हता. मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणारे काँग्रेसचेे मुंबईतील नेते भाई जगताप मोर्चाला हजर होते. राज्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात वगळता बाकीच्या नेत्यांनी मोर्चाकडे पाठ फिरवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मनोमिलन ़झाल्याचे शिक्कामोर्तब या मोर्चाने केले. सतत राजकीय भूमिका बदलणार्‍या राज ठाकरे यांच्या मनसेला विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. परिणामी मनसे व राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा मुंबईत व राज्यात प्रश्न उपस्थित झाला. राज ठाकरे यांनी आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून केला. उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना फोडण्यासाठी पडद्याआड भूमिका बजावणार्‍या भाजपाशी दोन हात करायचे आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांची साथ हवी आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाची ताकद या मोर्चात दाखवून देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महाविकास आघाडी व मनसे एक होतील, याची खात्री नाही, तरीही विरोधक निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि निवडणूक आयोगाची बाजू घेणार्‍या भाजपाच्या विरोधात एकत्र आले, ही काही कमी महत्त्वाची गोष्ट नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *