दुभत्या गायी दगावल्या, दुग्धव्यवसाय संकटात
विंचूर : प्रतिनिधी
येथील सालकाडे वस्तीवरील पशुपालकांची सात ते आठ दुभती जनावरे अज्ञात आजाराने दगावल्याने पशुपालक व शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रोगामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, दुग्धव्यवसाय धोक्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दहा-बारा दिवसांपासून येथील सालकाडे वस्ती व परिसरातील सुमारे पन्नासपेक्षा अधिक जनावरांना अज्ञात आजाराची लागण झालेली आहे. या अज्ञात आजाराने बंडू सालकाडे यांच्या सहा गायी टप्प्याटप्प्याने दगावल्या. पुंजाराम सालकाडे यांची म्हैसही दगावली. दुभती जनावरे दगावल्याने दुग्धव्यवसाय संकटात सापडला असून, शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.जनावरांना वाचविण्यासाठी येथील खासगी पशुवैद्यकांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण आजाराचे निदान न झाल्याने जनावरे मृत्युमुखी पडली. प्रभावग्रस्त गोठ्यांना पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राहुल कोठाळे यांच्यासमवेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल तोरण पवार व डॉ. पूजा देशमुख, पशु पर्यवेक्षक योगेश शिंदे आदींनी भेट देऊन मृत जनावरांचे विच्छेदन केले. रोग निदानाकरिता मृत जनावरांचे नमुने रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.
लसीकरणासाठी सहकार्य करावे
अज्ञात आजाराचा धोका लक्षात घेता पशुचिकित्सालय, विंचूरच्या वतीने बाधित जनावरांना औषधोपचार व लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनीदेखील जनावरांची काळजी घ्यावी. गोठ्यांमध्ये स्वच्छता ठेवावी. थंडीपासून जनावरांचे संरक्षण करावे. जनावरांना पोषक आहार व व्हिटॅमिन सप्लिमेंट द्यावे. गोठ्यात बाधित जनावर आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकीय चिकित्सालय, विंचूरशी संपर्क साधावा. सदरील जनावरांना त्वरित औषधोपचार सुरू करावा. लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विंचूर पशुवैद्यकीय चिकित्सालयातर्फे करण्यात आले आहे.
Unknown disease wreaks havoc among animals in Vinchur area