वडाच्या झाडांची विनापरवाना कत्तल

साकूर फाटा मार्गावर ब्रिटिशकालीन सावली नष्ट

बेलगाव कुर्‍हे : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यात व्हिटीसी फाटा ते साकूर फाटा या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम मंजूर झाले असून, सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत हरित लवादाने दिलेल्या आदेशाविरुद्ध दारणा धरण या मार्गावर दुतर्फा खूप मोठ्या प्रमाणावर ब्रिटिशकालीन असलेली 100 वर्षांपूर्वीची मोठमोठी वडाची झाडे कुठलीही परवानगी न घेता तोडण्यात आली आहेत.
इगतपुरीच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाची पर्यावरणविरोधात मुजोरी कधी थांबणार? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. याबाबत सदर वडाची झाडे वाचवण्याबाबत नाशिकचे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंते यांनी सदर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली असता, त्यांना सकारात्मक उत्तरे देण्यात आली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभाग इगतपुरी यांनी गेल्या दोन महिन्यांत तसेच गेल्या 20 ते 25 वर्षांत वेळोवेळी रस्ता रुंदीकरण, वाहतुकीस अडथळा, औंध नाल्यावरील पुलाचे रुंदीकरण व मजबुतीकरण असे विविध कारणे देत वरील दारणा धरण मार्गावरील जवळपास सर्वच वडाच्या झाडांची अक्षरशः कत्तल केली आहे. गरज नसताना बर्‍याच ठिकाणच्या झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी पूर्ण झाडेच बुंध्यासकट तोडण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांत दारणा धरण मार्गावरील तोडलेल्या झाडांची जबाबदारी वरील उपविभागावर टाकून त्याविरुद्ध वरिष्ठ अधिकारी यांनी कार्यवाही करणेदेखील अपेक्षित आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध मार्गावरील जी झाडे अद्याप तोडायची बाकी आहेत, त्याबाबत पर्यावरणाच्या माध्यमातून सारासार विचार करून ती तरी वाचवावीत, अन्यथा नाशिकचे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंते व पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरतील, असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.

वडाच्या झाडांची तोड थांबवण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी अधीक्षक अभियंता मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांना भेटून व पत्र देऊन कल्पना दिली होती. त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित कार्यकारी अभियंता यांना कार्यवाहीबाबत सांगितले होते; परंतु गेल्या दोन महिन्यांत त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, इगतपुरी यांचा वडाची झाडे तोडणे हा एक कलमी कार्यक्रम सुरूच आहे. अभियंते वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत असल्याचे व वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितल्यावरसुद्धा ते ऐकायला तयार नाहीत, असे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांत तोडलेल्या झाडांबाबत संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी, नाहीतर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे
दाखल करू.
– सुहास पाटील, सेवानिवृत्त अभियंता, जलसंपदा विभाग, नाशिक

Unlicensed felling of banyan trees

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *