सेंट्रल किचनमध्ये अस्वच्छता; गुणवत्तेचे तीनतेरा

दोन संस्थांना प्रशासनाधिकारी डॉ. चौधरींच्या नोटिसा

नाशिक : प्रतिनिधी
मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहाराच्या स्वयंपाकगृहांना (सेंट्रल किचन) प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी बुधवारी (दि.2) भेट देत पाहणी केली. या स्वयंपाकगृहात अस्वच्छतेसह आहारातील गुणवत्तेसह त्रुटी निदर्शनास आल्याने प्रशासनाधिकारी डॉ. चौधरी यांनी श्री स्वामी समर्थ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व द्वारकामाई महिला विकास बचत गट या दोन्ही बचत गटांना कारणे दाखवा नोटिसा बजावत दणका दिला आहे.
मनपा शहरातील 102 शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देतेे. 2022 पासून 42 संस्थांना यासाठीचे काम दिले आहे. मात्र, विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अनेकदा आरोप केले जातात. बुधवारी प्रशासनाधिकारी डॉ. चौधरी यांनी सातपूर विभागातील पाच सेंट्रल किचनला भेटी देत पाहणी केली. या भेटीदरम्यान तुळजाभवानी महिला बचत गट, छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, श्री स्वामी समर्थ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व द्वारकामाई महिला विकास बचत गटाकडून चालवल्या जाणार्‍या स्वयंपाकगृहाची पाहणी केली. या तपासणीदरम्यान स्वयंपाकगृहातील स्वच्छतेची स्थिती, धान्य व साठवणुकीची पद्धत, वापरले जाणारे तांदूळ तसेच सर्व संबंधित कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली गेली.

पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम दर्जाचा व पूरक आहार महत्त्वाचा आहे. शहरातील सर्व विभागांतील सर्व सेंट्रल किचनची पाहणी केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– डॉ. मिता चौधरी, प्रशासनाधिकारी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *