नाशिकरोड : वार्ताहर
काल सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसाने नाशिकरोडला झोडपुन काढले. भाजी विक्रेते, हातगाडीवाले व रस्त्याच्याकडेला बसलेले विविध वस्तू विक्रेते आणि नागरिकांचीही एकच तारांबळ उडाली. चार वाजेपासून सुरू झालेल्या पावसामुळे क्षणार्धात रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहू लागले. जेलरोडकडून बिटको चौकाकडे येणारे पाणी कोठारी कन्या शाळेपासून आणि महसूल आयुक्त कार्यालयासमोर डबक्यासमान साचले होते. ४.३० वाजता सुटलेल्या प्रेस कामगारांना बाहेर पडणे मुश्कील झाले होते. अर्धा पाऊण तास ते आयएसपी प्रेस मध्येच थांबुन होते. बिटको पॉइंट ते छ. शिवाजी महाराज चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्या चौकात आणि आंबेडकर रोडवरील क्रांती चौकाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यातुन वाहन चालकांना मार्गक्रमण करणे कठीण जात होते. गायकवाड मळ्यातील विठ्ठल चेंबर समोरील रस्ताही तलावासमान पाण्याखाली गेला होता. त्यातुन त्या रस्त्यावरील पाण्याखालील खड्डे आणि खडी यातुन दुचाकी स्वारांना मार्गक्रमण
करण्यासाठी कसरत करावी लागत होती. देवळालीगाव, जयभवानीरोड परिसरातील भाजी विक्रेत्यांचे हाल झाले. नाशिकरोडच्या उड्डाण पुलावर साचलेले पाणी वेगात वाहने गेल्याने पुलावरुन खाली फेकले जात होते. पुलावरील पाण्याचे आऊटलेटस बंद झाल्याचा हा परिणाम होता.