अवकाळीचा 600 हेक्टर पिकांना तडाखा

दिंडोरी तालुक्यातील शेतकर्‍यांवर संकट : कांदा पिकाचे नुकसान

दिंडोरी : प्रतिनिधी
एप्रिल आणि मे महिन्यांत दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सहाशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, एकशे सत्तावन हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. नुकसानामध्ये कांदा, भुईमूग, मका, पुदिना, शिमला मिर्ची यांसह भाजीपाला पिकांचा समावेश आहे. तर फुलशेतीचेही मोठे नुकसान झाले असल्याने फुलउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे,
जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा कहर सुरू असून, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा परिणाम थेट दरावर झाला आहे. सध्या बाजारात कांद्याला 700 ते 1000 रुपये सरासरी दर मिळत आहे. परंतु, पावसामुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे.
गत काही वर्षांमध्ये सिंचनाची सोय असलेले शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यावर्षी चांगले उत्पादन होईल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा असतानाच मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पाऊस कोसळला. तब्बल आठ ते दहा वेळा पाऊस कोसळला असून, दमट वातावरण आहे. त्यामुळे कांदा जमिनीमध्येच कुजत आहे. परिणामी, शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. काही शेतकर्‍यांचा कांदा काढणीचा खर्चही निघत नाही.
बेमोसमी पावसामुळे कांद्याचे भावही घसरले आहेत. एप्रिल महिन्यात तेराशे ते पंधराशे रुपये बाजारभाव असताना या आठवड्यात कांदा पिकाला सध्या बाजारात मिळत असलेला भाव हे उत्पादन खर्चाच्या तुलनेने कमी असल्याने शेतकर्‍यांना आता सरकारच्या आधाराची गरज आहे. कांदा खराब होऊ लागल्याने, तसेच चाळीतील कांद्याची घट होऊ लागल्याने शेतकरी मिळेल त्या भावाने उन्हाळी कांदा विक्री
करत आहेत.

गुलाब शेतीचेही सर्वाधिक नुकसान
तालुक्यातील जानोरी, मोहाडी, खडक सुकेणे, पालखेड, खेडगाव, आबे दिंडोरी, जऊळके दिंडोरी आदी ठिकाणी गुलाब शेती केली जाते. तालुक्यात 75 हेक्टर क्षेत्राखाली गुलाब शेती केली जाते, तर 15 हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाऊसमध्ये विविध प्रकारच्या गुलाबाची लागवड करून उत्पादन घेतले जात आहे. त्यासाठी एकरी 60 लाख रुपये खर्च येत आहे, तर उघड्यावरील गुलाब शेतीसाठी एकरी 5 लाख रुपये खर्च येतो, मात्र अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे 10 ते 12 पॉलिहाऊस जमीनदोस्त झाले, तर काहींचा प्लास्टिक कागद फाटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

यंदा चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांद्याची लागवड केली होती. मात्र, मॉन्सूनपूर्व पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असून व शेतकर्‍यांसाठी हा बाजारभाव तोट्याचा ठरत आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्याची गरज आहे.   –  मनोज शांताराम निकम, कांदा उत्पादक शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *