पाथर्डीत अवकाळी पावसामुळे गटारी तुंबल्या

सुदाम डेमसे यांच्या मध्यस्थीने तत्काळ कार्यवाही

सिडको : विशेष प्रतिनिधी
प्रभाग 31 पाथर्डी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागांत भुयारी गटारी तुंबल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. भीमाशंकरनगर, आनंदनगर, दामोदरनगर, मुरलीधरनगर, कडवेनगर, निसर्ग कॉलनी, स्वराज्यनगर, ज्ञानेश्वरनगर व वासननगर या भागांमध्ये पाणी साचून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी तातडीने नाशिक महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी जे. ई. रत्नपारखी व उपअभियंता हेमराज नांदुर्डीकर यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी संबंधित विभागांना सोबत घेऊन प्रभागातील विविध भागांची पाहणी केली. नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांची माहिती दिली.
यावेळी महानगरपालिका अधिकार्‍यांनी घटनास्थळीच आदेश देत लवकरात लवकर नालेसफाई, तुंबलेली गटारे व कॉलन्यांमध्ये साचलेले पाणी काढण्याची कामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी वेळेवर दाखवलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठा व जनतेच्या समस्यांप्रति असलेली संवेदनशीलता याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांच्या सक्रियतेमुळे प्रशासनाने वेळीच हालचाल केली आणि प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *