मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ज्योती चांदेकर या मराठी रंगभूमीवरील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. केवळ रंगभूमीवरच नाही, तर चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीवरील मालिकेतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ज्योती चांदेकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. लहान असतानाच त्यांनी काही नाटकात अभिनय केला. पुढे अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे असे ठरवून त्यांनी नाटकात भूमिका केल्या. त्यांनी अभिनय केलेले सुंदर मी होणार आणि मिसेस आमदार ही नाटके रंगभूमीवर तुफान गाजली. त्यातील त्यांच्या भूमिका त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरल्या. या भूमिकांनी त्यांना रंगभूमीवर असामान्य अभिनेत्री असा गौरव मिळवून दिला. या नाटकातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. त्यानंतर त्यांनी चित्रपटाकडे आपला मोर्चा वळवला. ग्यानबाची मेख हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी तिचा उंबरठा, ढोलकी, सुखांत, मी सिंधूताई सपकाळ, फुलवात, देवा, श्यामची आई या चित्रपटांतूनही भूमिका केल्या. ज्योती चांदेकर यांनी रणजित पंडित यांच्याशी विवाह केल्यावर त्यांना पौर्णिमा व तेजस्विनी या दोन मुली झाल्या. तेजस्विनी ही मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. लग्नानंतरही ज्योती चांदेकर यांनी आपले नाव बदलले नाही. ज्योती चांदेकर यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी त्यांच्या पतीने मोठा त्याग केला. ज्योती चांदेकर यांची अभिनय कारकीर्द सुरू राहावी यासाठी त्यांच्या पतीने आपली नोकरी सोडली आणि मुलींचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. ज्योती चांदेकर यांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार निर्माण झाले, पण त्या डगमगल्या नाहीत. आलेल्या संकटावर त्यांनी मात केली. आपली अभिनय कारकीर्द यशस्वी केली.
चित्रपट व नाटकांसोबतच त्यांनी टीव्हीवरील मालिकेतही भूमिका केल्या. त्यांनी साकारलेली ’ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजी, मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटातील सिंधूताई सपकाळ या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. देवा एक अतरंगी या चित्रपटामधील त्यांची भूमिकादेखील प्रेक्षकांना भावली. ज्योती चांदेकर यांनी असंख्य नाटकं आणि मालिका यांच्या माध्यमातून आपल्या अभिनय कलेचा अविस्मरणीय ठसा उमटवला. ठरलं तर मग आता या मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्णा आजी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या भूमिकेने त्यांना घराघरांत पोहोचवले. त्यांना श्रद्धांजली!
– श्याम ठाणेदार