जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : ‘कृषी कुंभ’चे उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकर्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
यांनी केले.
जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिव्हलअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, आत्मा आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृषी कुंभ-2026’ या चार दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन यूथ फेस्टिव्हल मैदानावर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कृषी कुंभचे उद्घाटन राज्य शासनाचा कृषी पुरस्कारप्राप्त महिला शेतकर्यांच्या हस्ते
करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, मालेगाव अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण व नाशिक अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच कृषी पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी मेधा बोरसे, विमलताई आचारी, सुनीता खेमनार, श्रद्धा कासार्डे, संगीता सांगळे, पूनम डोखळे आणि लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी कृषी कुंभ प्रदर्शनाला भेट देऊन विविध स्टॉलची पाहणी केली.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कृषी कुंभचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकर्यांनी या कृषी कुंभला भेट द्यावी, असे नियोजन करण्यात
आले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रास्ताविकात महोत्सवाची माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असल्याने कृषी कुंभचे उद्घाटन महिला शेतकर्यांच्या हस्ते करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी
मानले.
कृषी कुंभमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन
कृषी कुंभ प्रदर्शनात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध दालने उभारण्यात आली आहेत. ड्रोन तंत्रज्ञान, फसल आणि फायलो कंपनीचे स्मार्ट सेन्सर, इलेक्ट्रिक बुल तसेच कांदा चाळीसाठी सेन्सर आधारित यंत्रणा यासंबंधी माहिती देणारे स्टॉल येथे आहेत. यांत्रिकीकरण विभागाचे 30 हून अधिक स्टॉल असून, विविध शासकीय योजनांची माहितीही एकाच छताखाली उपलब्ध आहे.
चार दिवस विविध मार्गदर्शन सत्रे
13 मार्च : द्राक्षशेतीचा नवा मंत्र व निर्यातक्षमता
(पंकज नाठे, अनंत मोरे)
14 मार्च : डाळिंब शेती व मधमाशी पालन
(तुकाराम निकम, सोमनाथ गांगुर्डे)
15 मार्च : कांदा पिकाचे आधुनिक व्यवस्थापन
(डॉ. राजीव काळे, डॉ. तुषार आमरे)
16 मार्च : कृषी क्षेत्रातील एआयचा वापर (गटचर्चा)
याशिवाय, दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 14 मार्च रोजी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तर 15 मार्च रोजी ‘फोकलोक’ कार्यक्रम होणार आहे.