वह बंदूक और गोली भी हमारी होगी….गावातीलच १४ तरुणांनी वाजवला ‘गेम’

गावातीलच १४ तरुणांनी वाजवला ‘गेम’, ४ जण अटकेत
सिन्नर‌ : प्रतिनिधी
तडीपार असलेला सराईत गुंड भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (२७) रा. शहा ता. सिन्नर याची गावातीलच १४ जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १४ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत वावी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, शवविच्छेदनासाठी कांदळकर याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार होता.
भैय्या ऊर्फ प्रवीण कांदळकर हा दोन वर्षाच्या तडीपारीची शिक्षा भोगून घरी आला होता. शहा गावातीलच गोराणे नामक कुटुंबीयांशी त्याचे भैरवनाथाच्या यात्रेत वाद झाले होते. तेव्हापासून दोन्ही गटात एकमेंकावर कुरघोडी करण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी सौरभ गोराणे, दिनेश वाळीबा गोराणे, वाळीबा गोराणे, शरद दिंगबर गोराणे, विजय दिंगबर गोराणे, सचिन गोरख बागल, राहुल गोरख बागल, अतुल अशोक गोराणे, आबा गोटीराम गोराणे, रविंद्र गोटीराम गोराणे, वैभव विलास गोराणे, दगु साप्ते (पाहुणा अस्तगावकर), गणेश सोनवणे, सर्जेराव रघुनाथ गोराणे सर्वजण रा. शहा ता. सिन्नर जि. नाशिक हे हातात कोयता, कु-हाडी, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेवुन त्याच्या घरात शिरले. त्यांनी सर्वांनी एकत्रित भैया कांदळकरला जबरी मारहाण केली. त्यानंतर त्याला बाहेर ओढून आणत अंगणात टाकून देत पळ काढला. दरम्यान, जखमी अवस्थेत भैया कांदळकर याला त्याचे वडील आणि चुलत भावाने तातडीने प्रारंभी वावी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी त्याची आई विजया कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १४ जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.‌
शहा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सिन्नर, एमआयडीसी व वावी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल शहाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे करत आहे.
वावी, मुळगाव पोलिसात १६ पेक्षा अधिक गुन्हे…
तडीपार असतानाही भैय्या कांदळकर गावात येऊन सर्रास गुन्हे करत होता. तालुक्यात आणि शहा परिसरात त्याची प्रचंड दहशत होती. त्यामुळे पोलीस यंत्रणाही हतबल झाली होती. २ वर्षांपूर्वी तडीपार असताना तो गावात आला होता. वावी, मुसळगाव आणि सिन्नर पोलिसांनी त्याला  पकडण्यासाठी शहा येथील घराभोवती सापळा रचला होता.‌ यावेळी त्याने पोलिसांवर बंदूक रोखली होती. पोलीस कारवाईला अडथळा केला म्हणून त्याची पत्नी, वडील आणि आई यांनाही जेलची हवा खावी लागली होती. वावी पोलिसात त्याच्यावर १६ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मुसळगाव पोलीसातही एटीएम लुटीचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.‌
 ‘एमपीडीए’चा प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा…

एमपीडीए तथा महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, १९८१ अन्वये तडीपार गुंड भैया कांदळकर याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०२४ मध्ये वावी पोलिसांनी पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात काही त्रुटी काढल्याने त्याची पूर्तता वावी पोलिसांनी केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे वावी पोलिसांनी सांगितले. तत्पूर्वीच भैया कांदळकरचा ‘गेम’ झाला.

वह बंदूक और गोली भी हमारी होगी….
हम तुम्हे जरूर मारेंगे, लेकिन वह बंदूक भी हमारी होगी l उसकी गोली भी हमारे होगी, और वक्त भी हमारा होगा, ही भैया कांदळकरची फेसबुक स्टोरी भलतीच चर्चेत होती. गेल्या आठवड्यात भैयाने एका हाणामारीच्या घटनेनंतर बीके कंपनी, सुट्टी नाही कोणालाच ! दिला ना भाऊ रिप्लाय, असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे पोलिसांचाही त्याच्यावर वाॅच होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *