नाशिक

वालदेवी प्रदूषणाच्या विळख्यात; ड्रेनेजलाइनसह रस्त्यांची दुर्दशा

शिवसेना ठाकरे गट-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई; विकासाच्या मुद्यावरच उडणार धुरळा

नाशिकरोड विभागात सहा प्रभाग असून, त्यांपैकी प्रभाग 22 मध्ये मोठ्या प्रमाणात मळे परिसर आहे. देवळालीगाव, विहितगाव, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब ही गावे व मळे परिसरातील नागरिक मिळून प्रभाग 22 पूर्ण होतो. सलग प्रभाग नसल्याने विकासकामांत असमतोल प्रामुख्याने जाणवतो. परिणामी नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे प्रकर्षाने जाणवते. वालदेवीचे प्रदूषण, पाणीपुरवठ्याच्या जीर्ण जलवाहिन्या, विकसित होणार्‍या परिसरात मलवाहिकांची प्रतीक्षा, रस्त्यांची दुरवस्था व कचर्‍याचे ढीग आदी समस्यांमुळे मात्र नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत प्रचारात शीर्षस्थानी विकास हा प्रामुख्याने मुद्दा असेल. दरम्यान, प्रभाग 22 मधील निवडणूक शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात अटीतटीचा सामना रंगल्याचे बघण्यास मिळणार आहे. विशेषतः दोन्हींकडील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
महापालिकेत विरोधी बाकावर बसूनही विकासकामे करण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांकडून केलेला दिसतो; परंतु विरोधकांकडून प्रभागात कुठलाच विकास नसल्याचा आरोप होत आहे. प्रभाग 22 ला आमदार, महापौर, दोन सभापती लाभूनही सर्वांगीण विकासापासून प्रभाग दूरच दिसतो. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत सत्यभामा गाडेकर, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, तर भाजपकडून सरोज आहिरे विजयी झाल्या. सरोज आहिरे यांनी प्रभाग 22 मधून माजी महापौर नयना घोलप यांचा धक्कादायक पराभव करत येथूनच देवळाली विधानसभा मतदारसंघाची पायाभरणी केली. त्यानंतर आहिरे यांनी 2019 मध्येे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करत थेट आमदारकीच्या विजयाची माळ गळ्यात पडली. आमदार आहिरेंच्या रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जगदीश पवार यांनी विजय मिळवला. दरम्यान, पुढे शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. आता त्यांचा वारसा म्हणून ठाकरे गटाचे युवानेते योगेश गाडेकर प्रभागात सक्रिय असून, ते स्वत: उमेदवारी करणार आहेत.
महापालिका आणि देवळाली कॅन्टोन्मेंटच्या मधोमध असणारा प्रभाग म्हणजे 22 नंबरचा प्रभाग होय. विहितगाव, देवळालीगाव गावठाण, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब या गावांचा या प्रभागात समावेश होतो. या प्रभागाच्या दोन बाजूला भारतीय लष्कराचा परिसर असल्याने दोन बाजू अधिक संरक्षित आहेत. ग्रामीण भाग अधिक असून, शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला आहे. विशेषत: आजी-माजी आमदारांचे वास्तव याच प्रभागात राहिलेले आहे.
हा प्रभाग बर्‍यापैकी विखुरलेला असून, यात मळे विभाग अधिक आहे. गुंठेवारी प्लॉट घेऊन परिसर विकसित होत आहे; परंतु तेथे अद्याप ड्रेेनेजलाइन, पथदीप, पिण्याच्या पाण्याची वाहिनी, रस्ते, उद्यान आदी मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. उद्यानात गाजरगवत वाढले असून, खेळण्या तुटलेल्या आहेत. रात्रीच्या वेळी असे ठिकाण मद्यपींसाठी अड्डा झाले आहे.

विद्यमान नगरसेवक

 

केशव पोरजे,

जगदीश पवार,

सुनीता कोठुळे,

स्व. सत्यभामा गाडेकर

प्रभागाची व्याप्ती
देवळाली गावठाण, विहितगाव, वडनेर दुमाला, लवटे नगर, सौभाग्यनगर, बागुलनगर झोपडपट्टी, कोठुळे नगर, लॅम रोड, मथुरा रोड, इंद्रायणी सोसायटी, हांडोरे मळा, पिंपळगाव खांब गावठाण, खर्जुल मळा, गीते मळा, म्हसोबा नगर या प्रमुख भागाचा या प्रभागात समावेश होतो. उत्तरेला मिलिटरी एरिया हद्द ते खर्जुल चौक, पूर्वेला म्हसोबनगर, वालदेवी नदीचा काठ, दक्षिणेला विहितगाव शिवार, सौभाग्यनगर तर पश्चिमेला पिंपळगाव खांब शिव, पाथर्डी रोड .

बिबटयाची दहशत
मागील काही महिन्यांपासून बिबट्यांने वडनेर दुमाला व मळे परिसरात धुमाकुळ घातला आहे. एका चिमुकल्याचा यात मृत्यूही झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक दररोज दहशतीखाली आहे. सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे.

 

इच्छुक उमेदवार

केशव पोरजे, जगदीश पवार, सुनीता कोठुळे, योगेश गाडेकर, विक्रम कोठुळे, प्रभाकर पाळदे, नयना घोलप, प्रणाली कोठुळे, विकास गिते, अमोल आल्हाट, अन्सार शेख, कृष्णा शिंदे, अ‍ॅड. पद्मा थोरात, अमोल पवार, पोपट हगवणे, लंकाबाई हगवणे, विशाखा शिरसाट, डी. के. कोठुळे, महेंद्र पोरजे, दीपाली कोठुळे, पूजा नारद, प्रतिभा नारद, मनीषा जाधव, चंद्रकांत लवटे, अन्नपूर्णा लवटे, वैशाली दाणी, कुमार पगारे, दत्तू कोठुळे, गौरी साडे, मनोहर कोरडे, गणेश खर्जुल, गौरी खर्जुल, मंगेश लांडगे, चैतन्य देशमुख, स्नेहल देशमुख, विश्वास कापसे, सागर शिंदे, प्रियंका शिंदे, सोमनाथ बोराडे, संजय पोरजे, श्रद्धा फडवळ, समाधान कोठुळे, माधुरी ओहोळ, डॉ. युवराज मुठाळ, अंजनी पोरजे, तुळशी मरसाळे, प्रकाश कोरडे, मोनाली कोरडे, संजय हंडोरे, अतुल हंडोरे, शाहिद अब्दुल, रहेमान शेख.

लोकसंख्या

लोकसंख्या – 44624
अनुसूचित जाती – 6943
अनुसूचित जमाती – 1847

प्रमुख समस्या 
विहितगाव ते वडनेर गेट रस्ता रुंदीकरण, वालदेवी पूल, पिंपळगाव खांब येथे पालिकेच्या मलनिःसारण केंद्रामुळे नदी पात्रातील पाण्याचे होणारे प्रदूषण, उद्यानाचा अभाव, मथुरा रोडवरील जॉगिंग ट्रॅक आणि ग्रीन जिमाची दुरावस्था, शिवार रस्त्यांची दुरावस्था, कॉलनी रस्त्यांची दुरावस्था, वालदेवी नदीचे प्रदूषण, वालदेवी नदी स्वच्छता होत नाही, नैसर्गिक नाल्यातून ड्रेनेजचे पाणी वालदेवी नदी पात्रात मिसळणे, रेल्वे क्रॉसिंग ते बागुलनगर येथील सिग्नल दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण रखडलेले, झोपडपट्टीतील उघड्या गटारी, उघड्या नाल्यांमुळे दुर्गंधीचा प्रश्न कायमचे मार्गी लावण्याची मागणी

रखडलेली कामे

वडनेर दुमाला ते विहितगाव रस्त्याचे रुंदीकरण, शाळेच्या आवारात तीन वषार्ंपासून बांधलेली पाण्याची टाकी. नवीन टाकीला व्हॉल्व्ह बसवणे. वालदेवी प्रदूषण, नदीत सोडले जाणारे गटारीचे पाणी, पिंपळगाव खाब येथे पाण्याची टाकी बांधणेे, काका चौक ते वालदेवी पुलापर्यंत मिसिंग लिंक रोड करणे, लॅमरोडची सुधारणा करणे, गेल्या एक वर्षापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिसरातील सर्व नाल्यांची दुरवस्था. कचराकुंडीमुक्त परिसर कागदावरच. अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग. आठवडे बाजार मोठी समस्या असून, रस्त्यावरच भाजी बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडी, रेल्वे क्रॉसिंग ठिकाणी उड्डाणपुलाची प्रतीक्षा. घरपट्टीची अद्याप न झालेली नोंद. देवळालीगाव येथे सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था. गांधी धाममधील सफाई कामगारांची निवासे व घरकुल योजनेतील घरांची दुरवस्था. दशक्रिया विधीच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही. ठिकठिकाणी खड्डे.

नागरिक म्हणतात…

रोकडोबा वाडी ते पाटील नर्सरी वालदेवी नदीची दुरावस्था झाली असून ती प्रदुषणमुक्तीसाठी उपाययोजना करावी. यासह पाण्याच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होऊन पाण्याची परिस्थिती उदभवे. परिसरात अस्वच्छता असून दररोज स्वच्छतेची आवश्यकता.

-दत्ता आचट, रहिवाशी, देवळाली गांव

प्रभागाला लागून असलेली वालदेवी नदी फक्त पावसाळ्यातच वाहताना दिसते. इतर ऋतूत वालदेवीकडे नाला म्हणूनच बघितले जाते. नदीत मिसळणारे सांडपाणी मोठी समस्या बनली असून याला पायबंद घालण्याची उपाययोजनाच झालेली नाही. प्रदूषित पाण्यामुळे नदीच्या लगतच्या परिसरात रोगराईच्या समस्यांनी नागरिकांना ग्रासलेला आहे. एकेकाळी जीवनवाहिनी असणारी वालदेवी आता विविध समस्यानी वेढली आहे.
-अश्विनी वाघ, रहिवासी

झालेली विकासकामे

गुरुदेव दत्तमंदिर, देवळालीगाव आठवडे बाजार येथे सभामंडप.
• राजमाता जिजामाता अभ्यासिका नूतनीकरण. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सरावाकरिता अभ्यासिका.
• देवळालीगाव येथील मनपा आरक्षित वडारवाडीत लहान मुलांना खेळण्याकरिता उद्यान.
• विहितगाव, देवळालीगाव येथील कब्रस्तानात दुरुस्ती व सुशोभीकरण.
• देवळाली गावातील कुस्ती मैदान सुशोभीकरण, नवीन पाण्याची टाकी.
• वडनेर दुमाला, विहितगाव येथील क्रीडांगणाचे नूतनीकरण करून क्रीडाप्रेमींसाठी भव्य क्रीडांगण.
• देवळालीगाव रोकडोबावाडी येथे नवीन ड्रेनेजलाइन.
• विविध ठिकाणी रस्तेदुरुस्ती, काँक्रीटीकरण
पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या तयार करून पाइपलाइनचे काम.
• देवळालीगाव येथील महात्मा गांधी पुतळ्याचे सुशोभीकरण, भव्य दांडी मार्चचे शिल्प उभारले.
• संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण. पुतळ्यामागे शिल्प उभारून सुशोभीकरण.
• विहितगाव सिग्नल.
• जय जवान जय किसान स्मारक उभारून चौक सुशोभीकरण.
• वडनेर दुमाला येथे वारकर्‍यांचे शिल्प

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गावकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, 1 वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

16 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

20 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

20 hours ago