वर्चस्वाच्या संघर्षात 25 बिबट्यांचा मृत्यू

नाशिक : गोरख काळे
नाशिक प्रादेशिक वनविभागाच्या पश्‍चिम वनवृत्तात 2019 ते 2022 काळात विविध कारणांनी 50 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यातील 25 हून अधिक बिबट्यांचा मृत्यू अधिवासावरून म्हणजेच वर्चस्व सिद्ध करण्यात झालेल्या संघर्षात झाला आहे. दहा बिबट्यांचा अपघाती, तर आजारी पडून व अन्नाअभावी उर्वरित बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तर विहिरीत पडलेल्या बिबट्यांचे यशस्वी रेक्स्यू केल्याने मोठ्या संख्येने बिबट्यांचा जीव वाचविण्यात पश्‍चिम वनवृत्ताच्या पथकाला यश आले आहे.
नाशिक शहराच्या आजूबाजूला दररोज कुठेना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे. शहराच्या दोन्ही बाजूंचा परिसर गोदावरी व दारणा नदीचा असल्याने या भागामध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नाशिकरोडमधील जय भवानीरोड व इंदिरानगर भागात बिबट्या घुसल्याचे प्रकार नुकतेच घडले. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी होणार्‍या गर्दीमुळे वनविभागाचे नाकीनऊ आल्याचे चित्र होते. गेल्या काही वर्षांपासून बिबट्याची संख्या वाढत असून, याचे प्रमुख कारण म्हणजे, लपण्यासाठी सहज मिळणारे उसाचे शेत, सहज मिळणारे भक्ष्य. या कारणांमुळे बिबट्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. 92 दिवसांनंतर मादी बछड्यांना जन्म देते. मादी बिबट्या एक ते चार पिल्लांना जन्म देत असते. काही वर्षांपूर्वी बछडे जगण्याचे प्रमाण कमी असायचे. नर बिबट्याच्या हल्ल्यात हे बछडे मारले जायचे. परंतु, सध्या मादीने जन्म दिल्यानंतर पिल्लांना लपण्यासाठी उसाचे शेत मिळत आहे. यामुळे नर बिबट्यापासून पिल्लांचे संरक्षण होते आहे. त्यामुळेच उसाच्या क्षेत्राचा आश्रय मादी बिबट्याने घेतला आहेे.
बिबट्यांच्या मृत्यू होण्यामागील सर्वांत प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे स्वत:चा अधिवास संरक्षित ठेवणे. ही धडपड नर बिबट्याची असते. यातूनच परिसरात वर्चस्व ठेवण्यासाठी बिबट्यांमध्ये आपापसात संघर्ष होतो. या संघर्षामुळे 25 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातामध्ये बिबट्यांचे मृत्यू वाढल्याचे दिसतेय. रात्रीच्या वेळी मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरून बिबट्याा जाण्याचा प्रयत्न करत असल्याने भरधाव असलेल्या वाहनाच्या धडकेत बिबट्यांचे मृत्यू होत आहेत. त्र्यंबक रोड, मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग या रस्त्यांवरील अपघातांत बिबट्यांचे प्राण जात आहेत.
वाहनधारकांनो, वेगाला आवरा
विल्होळी, त्र्यंबकरोडच्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर बिबट्यांचे मृत्यू झाल्याचे आजवर दिसून आले आहे. या भागात बिबटे असल्याने वाहनधारकांनी वेग काही कमी ठेवण्याची आवश्यकता आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर या भागात असल्याने वाहने सावकाश चालविणे गरजेचे आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना बिबट्याची माहिती मिळावी याकरिता वनविभागाकडून रस्त्याच्या बाजूला बिबटे असल्याचे बोर्ड लावले आहेत. मात्र, तरीही वाहनधारक अतिवेगाने वाहने चालवतात. परिणामी, एखाद्यावेळेस बिबट्याला जोरदार धडक बसून यात त्याचा मृत्यू होत असल्याची भावना वन्यजीवप्रेमी बोलून दाखवत आहेत.
अडकलेल्या बिबट्यांचे
यशस्वी रेस्न्यू
नाशिकमध्ये बिबट्या तस्करीचे कोणतेही प्रकार आजपर्यंत झालेले नाही. रस्ते अपघात, आपापसातील संघर्ष, आजारामुळे, अन्नाअभावी बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. नाशिक परिसरात पाणी आणि अन्नाचे भरपूर स्रोत असल्याने परिसरात बिबट्यांची संख्याही तशी जास्तच आहे. तसेच पंचवीसहून अधिकवेळा जेथे बिबट्यांचे बछडे मिळून आले ते यशस्वीपणे मादी बिबट्याकडे सुपूर्द करण्यात आले.
– विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पश्‍चिम वनवृत्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *