सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रमिकनगर परिसरात गुरुवारी (दि. 22) रात्री अज्ञात टवाळखोरांनी सात वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी दोघा संशयितांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वीही श्रमिकनगरमध्ये दोन वेळा वाहनांची तोडफोड झाली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कडेपठार चौक, स्वामी समर्थ केंद्रामागील परिसर व सिद्धिविनायक चौकात विक्रांत साळवे, भाऊसाहेब आहिरे, अनिल राजवंशी, महेश कांबळे, रवींद्र वाघ, दत्तात्रय पाझरकर यांच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. रात्रीच्या वेळी दारू पिऊन गोंधळ घालणार्या टोळक्यांचा वावर वाढला असून, त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे असल्याच्या तक्रारी आहेत. हे टवाळखोर रात्रपाळीतील कामगारांना धमकावून लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी आमदार सीमा हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी भेट देऊन नागरिकांची भेट घेतली.
पोलिसांकडे वारंवार गस्त घालण्याची मागणी करूनही गुन्हेशोध पथक निष्क्रिय असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सातपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास सुरू आहे.
आतापर्यंत झालेल्या वाहन तोडफोडीच्या घटना
1ं9 फेब्रुवारी 2024 : श्रमिकनगरमध्ये सात गाड्यांची तोडफोड.
2ं5 मे 2024 : पाच वाहनांची काचा फोडल्या.
4ं डिसेंबर 2023 : ध्रुवनगरमध्ये तीन गाड्यांची तोडफोड.
1ं9 जानेवारी 2023 : जिजामाता शाळेजवळ चार वाहनांच्या काचा फोडल्या.
गुन्हेशोध पथक निद्रावस्थेत
रात्री गुन्हेशोध पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी गस्त घालण्याऐवजी
बहुतेक वेळा कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी गाडीतच झोपतात,
असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पोलिसच्या हलगर्जीपणामुळेच टवाळखोर मुक्तपणे वावरत आहेत.
नागरिकांनी रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची जोरदार मागणी केली आहे.