सटाणा : तालुक्यातील अंतापुर येथील मोसम नदी लगतच्या परिसरात जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई करीत छुप्या पद्धतीने अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत शेकडो लिटर रसायनासह 1 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात पोलिसांना यश आले असून, चार संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अंतापूर येथे मोसम नदी परिसरातील दाट झाडाझुडपांत गावठी दारूच्या हातभट्ट्या लावून मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची गुप्त माहिती जायखेडा पोलीसांना मिळाली होती. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी पोलीस कर्मचारी रवींद्र कोकणी, अरुण वन्स, पृथ्वीराज बारगळ, श्री. शिरोळे, क्षीरसागर आदी सहकार्यांसह घटनास्थळी धाड टाकली असता गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचा कच्चा रसायनाचा साठा तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारी साधनसामग्री व गावठी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात मिळून आली. पोलिसांनी साधनसामग्रीसह दारू बनवण्याचे साहित्य व गावठी हातभट्टीवरील दारूचे तयार रसायन असे एकूण 1 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या प्रकरणी अनुसयाबाई सोनवणे, नंदाबाई गवळी, रेखाबाई गवळी, गायत्री गवळी या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.