व्हायलेन्स.. व्हायलेन्स.. व्हायलेन्स..!

 

*व्हायलेन्स.. व्हायलेन्स.. व्हायलेन्स..!

 

डॉ. संजय धुर्जड*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

 

“व्हायलेन्स, व्हायलेन्स, व्हायलेन्स, आय डोन्ट लाईक इट. बट व्हायलेन्स लाईक्स मी, आय कान्ट अवोईड…!” हा डायलॉग ऐकलाच असेल. केजीएफ २ मधला हा फेमस डायलॉग म्हणजे चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हिंसाचाराचे बोलके उदाहरण आहे. अशाच प्रकारच्या किंबहुना त्याहून कैक पट अधिक हिंसाचारावर आधारित “अँनिमल” नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या त्याची भरपूर चर्चा प्रसार माध्यमे आणि एकंदरीत समाजात होत आहे. आजवरचा सर्वात जास्त हिंस्त्र चित्रपट म्हणून त्याची गणना होत आहे. मी तर अजून तो मुव्ही बघितला नाही, परंतु खूप काही ऐकलं आहे. निश्चितच असा चित्रपट फॅमिली सोबत बघणे शक्यच नाही. माझ्या काही जवळच्या मित्रांच्या बोलण्यावरून आणि एकंदर रिव्ह्यूवज् वरून असे वाटते की, या मुव्हीमुळे समाजातील तरुण वर्ग खूप प्रभावित झालेला वाटतो. खरंच, अशा चित्रपटांच्या निर्मितीची गरज आहे का? असा प्रश्न सहजच मनात येऊन गेला. वाटलं की यावर काहीतरी लिहावं, त्याचे विश्लेषण करावे, त्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवावा, या उद्देशाने आजचा लेख लिहीत आहे. माझे म्हणणे आणि मत पटले, तर ते इतरांपर्यंत ही पाहोचवा…

तसे बघितले तर, भारतीय चित्रपटांच्या इतिहासात “शोले” हा पहिला ऍक्शन मुव्ही म्हणावा लागेल. बंदुका, डाकू, हाणामारी, अत्याचार, बदला आणि हिंसा असलेला पहिला चित्रपट. त्यानंतर अशा प्रकारचे अनेक चित्रपट आले. याशिवाय इतर प्रकारच्या हिंसाचारावर आधारित विविध चित्रपट बनले, आताही बनताहेत. आजवरच्या अत्यंत हिंस्त्र चित्रपटांपैकी बँडिट क्वीन, सत्या, गॅंग्स ऑफ वसेपुर, संघर्ष, रक्त चरित्र यासारखे चित्रपट आले होते. गेल्या काही वर्षांत गझनी, बाहुबली, पुष्पा, केजीएफ १ आणि २ या ऍक्शन मुव्हीज आल्या होत्या. या सर्वांमध्ये हिंसाचार होता, परंतु त्यात अश्लीलता नव्हती. त्यामुळे असे चित्रपट बघतांना लज्जा वाटत नसल्याने ते मुव्हीज लोकांनी फॅमिलीसोबत आणि लहान मुलांसोबत बघातले. “अँनिमल” मध्ये हिंसाचारासोबत अश्लीलता असल्याने तो अधिक लज्जास्पद वाटतो. हेच आक्षेपार्ह आहे.

एका गोष्टीचे नवल वाटते की, सेन्सर बोर्डाला अँनिमल मुव्हीमध्ये काही गैर वाटले नाही का? जरी त्याला ए ग्रेड मुव्ही मध्ये गणले असेल, तर त्याची कुठेही चर्चा नाही. त्याचे सर्रास प्रोमोशन होत असताना सेन्सर बोर्डाने त्यास हकरत का घेतली नाही? पूर्वी चित्रपटात काही अश्लील सीन्सच काय, अश्लील भाषेतील डायलॉग सुद्धा वगळले जायचे. हल्लीच्या चित्रपटांमध्ये तर अशी भाषा सर्रास वापरली जात आहे. यामुळेच कदाचित सेन्सर बोर्डाला वाटत असेल की, किती किती काटछाट करावी, त्यापेक्षा जे आहे ते मंजूर करावे. अशामुळे सेन्सर बोर्डातील सदस्यांच्या भावना बोथट झाल्या असाव्या. या गोष्टी आता कॉमन झाल्या आहे, असे समजून त्याकडे दुर्लक्षही केले जात असावे. मोबाईल, इंटरनेट आणि टीव्हीच्या जमान्यात कुठे कुठे लगाम लावायचा, असाही विचार सेन्सर बोर्ड, निर्माते आणि दिग्दर्शक करत असावे. आता आम जनतेला, महिलांना आणि लहान मुलांना अश्लील भाषेत गैर वाटत नाही, असा या सगळ्यांचा समज झाला असावा.

असे म्हणतात की, चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे घडते, जे काही प्रचलित आहे, ते चित्रपटातून दाखवले जाते. मला असे वाटते की, चित्रपटात जे घडते, त्याचाच परिणाम समाजावर होत असतो. लोकांचे विचार, त्यांच्या कल्पना, इच्छा आणि अपेक्षा चित्रपट बघून उत्पन्न होतात, असे म्हंटले तर ते चुकीचे असणार नाही. कारण, पडद्यावरील हिरो-हिरोईन जसे करतात, तसेच आपणही करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, किव्हा आपण करू शकतो असेही वाटते. मग ते डायलॉग असो, की फॅशन, की प्रेम प्रकरण असो, सगळे काही मुव्हीजमधून कॉपी केले जाते. त्याचप्रमाणे मारामारी करणे, बाईक किव्हा कार चालवणे, चोरी करणे, मर्डर करणे अशा गोष्टीही मुव्हीजपासून प्रेरित असतात. ६० च्या दशकांत रोमँटिक चित्रपट अधिक असायचे. हिरो हिरॉईनच्या पडद्यावरील हालचाली आणि हावभाव खूप मृदू असायच्या. डायलॉग आणि चेहऱ्यावरील हाव-भावांवर अधिक भर असायच्या. नंतर हळू हळू ऍक्शन वाढली आणि आता डायलॉग कमी ऍक्शनच अधिक असते. हेच आता समाजात बघायला मिळते.

लोकांना हे कळत नाही की, मुव्ही बनवतांना छोटे छोटे शॉट्स मिक्स केले जातात. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या मदतीने स्पेशल इफेक्ट्स निर्माण केले जातात. देखणेपणा, भव्यता आणि भयानकता वाढवली जाते. प्रत्येक शॉट अधिक प्रभावी कसा होईल, यावर भर दिला जातो. सत्य घटना, एखाद्याचा जीवनपट, किव्हा इतिहासावर आधारित चित्रपटात तिखट, मीठ, मसाला टाकतात ते याच उद्देशाने. त्याचे नाटकीकरण केल्याशिवाय दर्शक आकर्षित होत नाही, हेही तितकेच खरे. परंतु, करमणुकीच्या नावाखाली जसा इतिहास बदलू नये, तसेच करमणुकीच्या नावाखाली काल्पनिक हिंसाचार आणि अश्लीलता दाखवू नये, असे मला वाटते. त्याचा सर्वसामान्यांवर, विशेष करून महिला आणि तरुणांवर काय परिणाम होऊ शकतो, याचा विचार चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सर बोर्डाने करावा, अशी माफक अपेक्षा आहे.

आज तुम्ही कुठल्याही शाळेत, कॉलेजात किव्हा तरुणांमध्ये वावरलात, त्यांची भाषा ऐकली तर तुम्ही थक्कच व्हाल. त्यांचे शिक्षण, व्यवसाय आणि पैसा या विषयांबद्दलचे विचार बघितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. मित्र, मैत्रीण असणे, अफेअर करणे, ब्रेकअप होणे या गोष्टी कॉमन मानल्या जातात. इतकंच काय तर, सिगारेट ओढणे, ड्रिंक्स घेणे, शारीरिक संबंध असणे यात काही गैर वाटत नाही. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात कमी अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती आहे. काही विशिष्ट घटकांमध्ये तर मर्डर करणेही सहज सोप्पे वाटते. नाशिकमध्ये कितीतरी खुनाचे प्रकरणे आपण रोजच पेपरात वाचतो. किरकोळ कारणांवरून हत्या केली जाते. खून करण्याला इतरही बाबी कारणीभूत असतील, परंतु, चित्रपटांचाही त्यात मोठा वाटा आहे. कॉलेज रोडच्या आसपास फेरफटका मारून बघा. फिल्मी स्टाइल गाड्या चालवल्या जातात, मुलींची छेड काढली जाते, मंगळसूत्र-चेन ओढल्या जातात, तोकडे आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घातले जातात, सिगरेट आणि मद्याचे सेवन केले जाते, मर्डर केले जातात. हा चित्रपटांचा परिणाम नाही तर अजून काय आहे? विषय गंभीर आहे, पण याला पर्याय आणि उपाय माझ्याकडे नाही. तसा तो कुणा एकाकडेही नाही. याबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. नाही तर, अमेरिकेप्रमाणे आपल्याकडेही शाळेतील मुलांकडे बंदुका बघायला मिळतील, कपडे बदलावे तसे लाईफ पार्टनर्स बदलले जातील, आई-वडिलांना वाळीत टाकणारे मुलं घडतील, वृद्धाश्रम वाढतील, सिगारेट दारू आणि जंक फूडमुळे रोगी वाढतील. हे आत्ताच थांबले नाही तर एक दिवस चित्रपटातील हिंसाचार आणि अश्लीलता घरातील टीव्हीवर बघावी लागेल. आपण आपल्या भावी पिढीला यापासून दूर ठेवणे आणि त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवणे हेच काय ते सध्या आपल्या हाती आहे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *